सातारा, (प्रतिनिधी) – प्राचार्य रमणलाल शहा शनिवार, दि. 17 रोजी 91 व्या वर्षात पदार्पण करीत असून त्याचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर त्यांनी लिहिलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज एक युगप्रवर्तक सेनानी’ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ सोमवार, दि. 19 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 4 वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित केला आहे.
या प्रकाशन समारंभास खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, रामराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, ना. महेश शिंदे, माजी उपसचिव चंद्रकांत दळवी, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन,
शिवसेनेचे उपनेते (ठाकरे गट) नितीन बानुगडे पाटील, चित्रपट व मालिका लेखक प्रताप गंगावणे, ख्यातनाम वक्ते प्राचार्य यशवंत पाटणे,
भाजप सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सातारा एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन चेतना माजगावकर, प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शहर सदस्य शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत.
‘छत्रपती शिवाजी महाराज एक युगप्रवर्तक सेनानी’ या ग्रंथाला शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, प्रशासनातील नामवंत व्यक्ती, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दोन माजी अध्यक्ष, शिवचरित्राचे अभ्यासक व व्यासंग असणारे अशा 11 नामवंतांचे अभिप्राय या ग्रंथाला लाभले आहेत.
‘छत्रपती शिवाजी महाराज एक युगप्रवर्तक सेनानी’ हा 600 रुपये मूल्य असलेला ग्रंथ फक्त प्रकाशनाच्या दिवशी 100 रुपयात देण्यात येणार आहे.
या प्रकाशन समारंभास जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक, उद्योग, बँका, कायदा, सहकार इ. सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी उपस्थित रहावे असे आवाहन नितीन शहा व रोहीत शहा यांनी केले आहे.