दिवसाला एक लाख लसीकरण अशक्‍यच

लसींचा पुरवठा तितक्‍या प्रमाणात होऊ शकत नसल्याचे वास्तव


सध्या सरासरी 19 हजार जणांनाच मिळतेय लस

पुणे – पुणे महापालिकेला दिवसाला एक लाख लसीकरणाचा टप्पा पार होणे अशक्‍यच असून, मुळात रोजच्यारोज एवढी लसच उपलब्ध होऊ शकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे केंद्र किती जरी वाढवली तरी त्याचा उपयोग होणार नाही.

शहरात सुमारे 110 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. महापालिकेने 325 केंद्रांचे नियोजन केले आहे. तेवढे प्रत्यक्षात सुरू झाले नाहीत. त्यामुळे सध्या रोजचे 18 ते 19 हजारच लसीकरण होत आहे. याशिवाय राज्याकडून लसींचा डोस मर्यादित स्वरूपात मिळत असल्याने दिवसाला एक लाख डोस एका महापालिकेला मिळणे किंवा राज्याकडून ते एकाच महापालिकेला पुरवणे प्रत्यक्षात शक्‍य नाही. त्यामुळेच महापालिका, जिल्हापरिषदा आणि एकूणच राज्याने लाखोंचे टार्गेट जरी ठरवले तरी ते पूर्ण होऊ शकणार नाही.

3 लाख 45 हजार “कोवॅक्‍सिन’ डोस आले
सोमवारी राज्याला “कोवॅक्‍सिन’चे 3 लाख 45 हजार डोस मिळाले आहेत. त्यात पुण्यातही जिल्ह्यासाठी ते वितरित करण्यात येतात आणि जिल्ह्याकडून ते महापालिकेला मिळतात. मंगळवारी महापालिकांना ते वितरित केले जाणार आहेत, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

कोणत्याही रुग्णालयाने, महापालिकेने किंवा जिल्ह्याने उद्दिष्ट ठरवून आता काही उपयोग नाही. केंद्राकडून आम्हांला लस उपलब्ध किती होते त्यावर आमचे पुढचे वितरण ठरते. त्यामुळे दिवसाला एक लाख ठरवल्यामुळे त्यांना एक लाख डोस द्यायचे असे होत नाही.
– डॉ. दिलीप पाटील, राज्य लसीकरण प्रमुख


पुणेकरांना रोज एक लाख डोस देण्याची तयारी असली, तरी आम्हांला शासनाकडून तितक्‍या प्रमाणात डोस सध्या मिळत नाहीत. ते जेव्हा मिळतील, तेव्हा आम्ही दिवसाला एक लाख डोस देऊ शकू. पण, यंत्रणा उभी केली जात आहे.
– डॉ. आशीष भारती, महापालिका आरोग्य प्रमुख

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.