अहमदाबाद – एका गुजराती दैनिकाने केलेल्या मृत्यूंच्या पडताळणीतून त्या राज्यातील हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे.
त्यानुसार गुजरातमध्ये दररोज दीड हजार लोकांचा मृत्यू होत असून, अवघ्या 71 दिवसात 1 लाख 23 हजारांहून अधिक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एवढे मृत्यूप्रमाणपत्र सरकारकडून वाटण्यात आले असले, तरी राज्यात साडेचार हजार मृत्यू झाले असल्याचे सरकार सांगत आहे.
राज्यात 1 मार्च 2021 ते 10 मे 2021 या कालावधीत वाटप करण्यात आलेल्या मृत्यू प्रमाणपत्राच्या आकडेवारीची पडताळणी करण्यात आली. त्यातून हा धक्कादायक आकडा समोर आल्याचे संबंधित वर्तमान पत्राने आपल्या बातमीत म्हटले आहे.
71 दिवसांमध्ये 33 जिल्हे आणि 8 महापालिकांद्वारे 1लाख 23 हजार 871 मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. तर विरोधाभास म्हणजे राज्यात केवळ 4 हजार 218 जणांचाच करोनामुळे मृत्यू झाल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. त्यामुळे गुजरातमध्ये 71 दिवसात सव्वा लाख लोकांचा मृत्यू कशामुळे झाला, असा प्रश्न आता उभा राहिला आहे.