सासवड (पुणे) – पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर पीएमपी बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पवावाडी-चंदनटेकडी (ता. पुरंदर) येथे सोमवारी (दि. 9) सायंकाळी उशीरा घडला. याप्रकरणी पीएमपी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोकुळ गोविंद गायकवाड (वय 38) असे मृत झालेल्याचे तर सुभाष सोरसे (नाव पत्ता समजाला नाही) असे जखमी झालेल्याचे, ज्ञानेश्वर रामचंद्र बनकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पीएमपी चालकाचे नाव आहे. तर स्वप्निल भाऊसाहेब मोडक (वय 29) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबतची माहिती अशी की, फिर्यादी मोडक हे त्यांच्या कारने वडकीच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पवारवाडी येथील सिद्धेश्वर मंगल कार्यालयासमोर पुढे चालेल्या एका दुचाकीला पीएमपीने मागून जोरदार धडक दुचाकीला पुढे फरफटत नेले. त्यामुळे दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले होते. बस थांबताच बघ्यांची एकच गर्दी झाली होती. त्यातील एकाने मयत गोकुळ गायकवाड यांना ओळखले. व जखमींना जवळील रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी गायकवड यांचा अतिरक्तस्त्रावाने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर सोरसे यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील तपास सासवड पोलीस ठाण्याचे एच. सी. चांदगुडे करीत आहेत.