नागपूर : नागपूरात औरंगजेब याच्या कबरी प्रकरणात विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या मोर्चानंतर सायंकाळी दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली. दोन गटांमध्ये झालेल्या राड्यानंतर जाळपोळ, तोडफोड तसेच दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक झाल्याने या जमावाला आवरताना पोलिस आणि नागरिक जखमी झाले होते. या हिंसाचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. इरफान अन्सारी असं मृत व्यक्तीच नाव आहे.
नागपूरच्या मेयो रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. राडा झालेल्या भागात ते जखमी अवस्थेत आढळून आला होता. नागपूर हिंसाचार प्रकरणात आरोपींची संख्या 105 झाली आहे. आरोपींमध्ये 10 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. हमीद इंजिनिअरवर हिंसाचाराचा कट रचल्याचा आरोप आहे. हमीद इंजिनिअर मायनॉरीटी डेमोक्रॅटीक पक्षाचा कार्याध्यक्ष आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेकडून दोन प्रकरणांची चौकशी सुरु आहे. या हिंसाचार प्रकरणात देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेल्या फहीम खानने जामिनासाठी अर्ज केला आहे. फहीम खानच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होईल. डीसीपी हल्ला आणि महिला विनयभंगाचं प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.
पोलिसांची मोठी कारवाई
नागपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि युट्यूबर मोहम्मद शहजाद खान यांना अटक केली आहे. सोशल मीडियाद्वारे हिंसाचार घडवण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या अटकेमुळे सोशल मीडियाद्वारे दिशाभूल करणारा प्रचार करणाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
नागपूर पोलिस आणि सायबर सेल या प्रकरणात अधिक पुरावे गोळा करत आहेत जेणेकरून हिंसाचारात सहभागी असलेल्या इतर संशयितांना अटक करता येईल. सोशल मीडियावर प्रक्षोभक विधाने करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे आणि अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर, नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या किंवा भडकाऊ संदेश टाळण्याचे आणि अफवा पसरवणाऱ्यांबद्दल प्रशासनाला तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले जात आहे.