कंटेनर-जेसीबीच्या अपघातात एक ठार

एक गंभीर जखमी : सुपा मुख्य चौकात आणखी एकाचा बळी

सुपा – नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्‍यातील सुपा येथील मेन चौकात जेसीबी-कंटेनरच्या अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि. 11) सकाळी सव्वानऊच्या सुमारास घडला.

याबाबत शौकत कादर शेख यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून जेसीबी व कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, सोमवारी सकाळी सव्वानऊच्या दरम्यान विना क्रमांकचा जेसीबी घेऊन प्रवीण (पूर्ण नाव माहीत नाही) हा पारनेरकडून येत होता. हा जेसीबी नगर-पुणे रस्त्यावर पुण्याकडे जाण्यासाठी वळत असताना कंटेनर (क्र. एमएच- 20 डीई- 1553) यास धडकला.

यावेळी रस्त्याच्या कडेला उभे असलेले नसीर अब्दुल शेख यांच्या अंगावर ही वाहने गेली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर संतोष यादव अवचिते हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कंटेनरवरील चालक पळून गेला. याबाबत सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस करत आहेत.

दरम्यान सुमारे दहा ते बारा गावांची मुख्य बाजारपेठ असलेल्या सुपा येथे मेन चौकात प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. याच चौकातून नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक तसेच सुपा-पारनेर व सुपा-इतर बारा गावांची वाहतूक होते. वाहनांची गर्दी असल्याने या ठिकाणी नेहमी छोटे-मोठे अपघात यापूर्वी झालेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलीस नेमावा, अशी मागणी अखिल भारतीय माहिती सेवा समितीने केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने आणखी एकाचा बळी याठिकाणी गेला असून, एकास कायमचे अपंगत्व आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)