देवदर्शनावरून परतताना घडली घटना सर्वजण उत्तरप्रदेशचे रहिवासी
कराड – पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड फाटा, ता. कराड येथे कारची कंटेनरला धडक बसली. महाराष्ट्रातील देवदर्शन करून उत्तरप्रदेशकडे परतताना हा अपघात झाला. यात एक जण ठार तर चौघे गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
अशोक तिवारी (वय, 35 रा. विजयवाडा, उत्तरप्रदेश) असे ठार झालेल्याचे नाव आहे. तर मधु अशोक तिवारी (वय 28), महम्मद हारूण (वय 40) यांच्यासह तिवारी यांची दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. जखमींपैकी मधु तिवारी यांची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, तिवारी कुटुंबीय विजवाडा उत्तरप्रदेश येथून नवीन कारमधून महाराष्ट्रात देवदर्शनासाठी आले होते. शिर्डी येथील देवदर्शन आटोपून ते रात्री कोल्हापूरच्या दिशेने निघाले होते.
पुणे-बेंगलोर महामार्गावर सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कारवरील चालकाचा ताबा सुटून समोर कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या कंटेनरला (क्र. एन. एल. 01 एल 6127) कारची जोरात धडक बसली. जोराची धडक झाल्याने कार कंटेनरखाली घुसली. या अपघातात चालकासह तिवारी कुटुंबातील चार असे पाच जण गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी व महामार्ग पोलीसांनी जखमींना उपचारासाठी देखभालच्या रूग्णवाहिकेतून रूग्णालयात पाठवले. मात्र अशोक तिवारी यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. अपघातानंतर कराड-कोल्हापूर लेनवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघाताची माहिती कराड पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.