अडीचशे रुपयांवरून एकाचे अपहरण, मारहाण

दहिवडीत उसने पैसे दिले नसल्याने हॉटेल व्यावसायिकचे कृत्य

शिक्रापूर – दहिवडी (ता. शिरूर) येथील एकाला उसने दिलेले अडीचशे रुपये वेळेत परत न दिल्याने हॉटेल व्यावसायिकाने त्याचे अपहरण, दमदाटी करून मारहाण केली. यावरून हॉटेल व्यावसायिकावर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सुरेश राजाराम नेटके (रा. दहिवडी नेटकेवस्ती, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली पोलिसांनी अमोल कैलास सातकर (रा. दहिवडी) याच्याविरुद्ध अपहरण, जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी तसेच मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल केले.

सुरेश नेटके यांनी त्यांच्या गावातील अमोल सातकर या हॉटेल व्यावसायिकाकडून अडीचशे रुपये उसने घेतलेले होते. अमोल याने पैसे मागितले असताना नेटके यांनी चार-पाच दिवसांत पैसे परत देतो, असे सांगितले होते. रविवारी (दि. 28) नेटके हे दहिवडी एसटी स्थानकावर थांबलेले असताना त्याठिकाणी अमोल सातकर हा त्याच्या जवळील कार घेऊन आला व नेटके यांना माझे पैसे कधी देणार असे म्हणत कारमधून खाली उतरून जातीवाचक शिवीगाळ करत दमदाटी करून हाताने मारहाण केली.

नेटके यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून न्हावरा रोड लगत असलेल्या अमोलच्या मालकीच्या हॉटेलमध्ये नेले. तेथे बसवून ठेवत शिवीगाळ, दमदाटी केली. रात्री अकराच्या सुमारास हॉटेल बंद करण्याच्या वेळेस हॉटेलवरून घरी जाण्यास सांगितले. नेटके यांनी घरी गेल्यानंतर घडलेला प्रकार पत्नी व वडिलांना सांगितला. यानंतर सांमवारी शिक्रापूर पोलिसांत तक्रार दिली. पुढील तपास डॉ. सचिन बारी व पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)