पिंपरी – पिस्तुल खोटे आहे, असे म्हटल्याचा राग आल्याने एका सराईत गुन्हेगाराने केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला. ही घटना मिलिंदनगर, पिंपरी येथे रविवारी (दि. १) मध्यरात्री घडली.
गुरूप्रित हरदेवसिंग जावंद (वय २२, रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने सोमवारी (दि. २) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सनी परदेसी / रोकडे (रा. तापकीर चौकाजवळ, काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुरूप्रित आणि त्याचा मित्र सुनील सिद्धांत बहोत हे दोघे जण रविवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास मिलिंदानगर, पिंपरी येथे रिक्षात दारू पीत बसले होते. त्यावेळी आरोपी सनी रोकडे हा तिथे आला. त्याने आपल्या कमरेला खोचलेले पिस्तुल काढून फिर्यादी गुरुप्रीत याला दाखविले. मात्र हे पिस्तुल नकली असल्याचे गुरुप्रीत म्हणाला. यामुळे आरोपी सनी रोकडेला त्याचा राग आला. या रागातून सनीने पिस्तूलातून गुरुप्रितवर गोळी झाडली. ही गोळी गुरुप्रीत याच्या खांद्याला लागून तो जखमी झाला आहे. त्याच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.