शिक्रापूर (प्रतिनिधी) : शिक्रापूर ता. शिरूर सह सणसवाडी परिसरात वारंवार कोरोना रुग्ण आढळून येत असतान आता शिक्रापूर येथे एक तसेच सणसवाडी येथे दोन असे तीन कंपनी कामगार कोरोना बाधित झाले असल्याचे शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी सांगितले आहे.
शिक्रापूर ता. शिरूर येथे एका नामांकित कंपनीतील तीन कामगारांना एका मागे एक कोरोनाची बाधा झाली होती, त्यांनतर एका कामगाराच्या घरातील तब्बल सात जण कोरोना बाधित होऊन त्यामध्ये तीन वर्षीय व सात वर्षीय बालकांचा समावेश असल्याने खळबळ उडाली होती, त्यांनतर आता नव्याने शिक्रापूर येथील त्याच कंपनीतील करंजेनगर शिक्रापूर येथे राहणाऱ्या एका कंपनी कामगाराची कंपनीने कंपनीत वारंवार रुग्ण आढळून येत असल्याने तपासणी केली असता त्या कामगाराचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर सणसवाडी येथील एका कंपनीतील एका कामगाराचा कंपनीने केलेल्या तपासणीमध्ये सणसवाडी मध्ये राहणाऱ्या स्थानिक कामगाराचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्याच कंपनीतील एका कामगाराने खबरदारी म्हणून तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे सणसवाडी मध्ये नव्याने दोन कोरोना बाधितांची भर पडली असल्याने सणसवाडी मध्ये नव्याने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या नऊ झाली आहे, तर शिक्रापूर व सणसवाडी परिसरात एकाच कंपनीत वारंवार कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्याने नागरिक व ग्रामस्थ देखील भयभीत झाले असून कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, सणसवाडी व शिक्रापूर येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने सदर रुग्ण राहत असलेला परिसर निर्जंतुकीकरण करत फवारणी करण्यात आली आहे, तर शिक्रापूर येथील रुग्णाच्या संपर्कातील तीन जण तसेच सणसवाडी येथील दोन्ही रुग्णांच्या संपर्कातील नऊ जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून आरोग्य विभागाच्या वतीने त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.
नागरिकांनी घाबरून जास्तीत जास्त काळजी घ्यावी – डॉ. प्रज्ञा घोरपडे
शिक्रापूर सह परिसरातील अनेक गावांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांनी घाबरून न जाता, मास्कचा वापर करावा, विनाकारण बाहेर पडू नये, गर्दी करू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, काही संशयित लक्षणे आढळून आल्यास आरोग्य विभागाशी संपर्क करावा असे आवाहन तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रज्ञा घोरपडे यांनी केले आहे.