पर्यटन हंगामाचा शुभारंभ; कास समितीच्या वतीने “कास पठार दर्शन’चा उपक्रम
सातारा – जागतिक नैसर्गिक वारसास्थळ असलेल्या कास पुष्प पठाराचा पर्यटन हंगम सुरू झाल असून प्रवेशासाठी प्रतिव्यक्ती 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व 12 वर्षांखालील मुलांना प्रवेश शुल्क माफ असणार आहे. तसेच शालेय व महाविद्यालयीन सहलीकरिता प्रति विद्यार्थी 20 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच कास पठार कार्यकारी समितीच्या वतीने यंदापासून परिसरातील विविध ठिकाणांना भेट देण्यासाठी “कास पठार दर्शन’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
कास पुष्प पठाराच्या 2019 च्या पर्यटन हंगामाचा शुभारंभ खासदार उदयनराजे भोसले, माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते नकताच झाला. यावेळी मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा उपस्थित होते. पर्यटकांसाठी घाटाई फाटा येथे विनामूल्य वाहनतळ उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. वाहनतळापासून पुष्प पठारावर जाण्याकरीता बसची व्यवस्था करण्यात आलेली असून त्याकरिता दहा रुपये प्रतिव्यक्ती प्रवासभाडे आकारले जाणार आहे.
पर्यटकांसाठी कास पठारावरील रस्त्यावर फिरण्याकरिता सशुल्क सायकल्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच कास पठार कार्यकारी समितीच्या वतीने यंदापासून कास पठार व पठारावरील घाटाई देवी, कास तालव, वजराई धबधबा, सह्याद्रीनगर पवनचक्की प्रकल्प, एकिव धबधबा, शिवसागर जलाशय यासारख्या प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडवण्याची सोय “कास पठार दर्शन’ या उपक्रमांतर्गत 400 रुपये प्रतिव्यक्ती सशुल्क बससेवेमार्फत करण्यात आलेली आहे.कास पुष्प पठारावर असणारी जैवविविधता हा दुर्मिळ ठेवा असून त्याचे जतन होणे आवश्यक आहे.
त्यामुळे जैवविविधतेचे नुकसान करणाऱ्या पर्यटकांना भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (फ) नुसार कारवाई होणार असून 500 ते एक हजार रुपयापर्यंत दंड आकारला जाणार आहे. तसेच www.kar.ind.in हे कास पुष्प पठाराचे अधिकृत संकेतस्थळ असून पर्यटकांना कास पठारावर येण्यासाठी या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी फक्त ऑनलाइन बुकिंग असणाऱ्या पर्यटकांना कास पठारावर प्रवेश दिला जाणार आहे.