महामेट्रोने उभारलेल्या माहिती केंद्राला नागरिकांचा वाढता प्रतिसाद
माहिती केंद्र : कोथरूड, बालगंधर्व रंगमंदिर,
बंडगार्डन. वेळ : सकाळी 8 ते रात्री 11
पुणे – महामेट्रो’तर्फे उभारण्यात आलेल्या माहिती केंद्रांना सुमारे 1 लाख 20 हजार नागरिकांनी भेट दिली आहे. यामध्ये महाविद्यालयीन तरुण तसेच 50-60 वयोगटातील नागरिकांचा समावेश
सर्वाधिक आहे.
पुणे मेट्रोचे 33% काम पूर्ण झाले असून, कामासंबंधी माहिती पुणेकर नागरिकांना पोहोचवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या माहिती केंद्रात कर्मचाऱ्यांमार्फत मेट्रोसंबंधी संपूर्ण माहिती देण्यात येत आहे. तसेच या माहिती केंद्रात नागरिकांच्या सूचना, तक्रारी यादेखील नोंदवून घेण्यात येत आहेत.
संबंधित अधिकारी यांना त्याविषयी माहिती देऊन कळवण्यात येत आहे. मेट्रोची विविध माहिती पुस्तिका, दृक श्राव्य माध्यम, व्हिडिओ क्लिप्स इत्यादी अनेक माध्यमांद्वारे मेट्रोसंबधी अद्ययावत माहिती या केंद्रात उपलब्ध आहे. बालगंधर्व रंग मंदिर येथे पुणे मेट्रोच्या कोचच्या आकारासारखे माहिती केंद्र बनवण्यात आले आहे. त्यामुळे तेथे भेट देणाऱ्या नागरिकांना पुणे मेट्रोचे कोच कसा असेल आणि त्यात काय सुविधा असतील,यासंबंधी माहिती मिळते. बालगंधर्व येथील माहिती केंद्र तरुणाईमध्ये लोकप्रिय झाले आहे. केंद्रांना महिन्याला सुमारे एका महिन्यात अंदाजे 10,000 नागरिक माहिती केंद्राला भेट देत असतात. बालगंधर्व माहिती केंद्रात प्राथमिक शाळेचे विद्यार्थी सहल म्हणून भेट देत आहेत. जवळपास पुण्यातील सर्वच प्राथमिक शाळांनी या माहिती केंद्राला भेट दिली आहे, असा दावा महामेट्रोतर्फे करण्यात आला आहे.