पाकिस्तानातील शंभर मौलवी संशयित दहशतवाद्यांच्या यादीमध्ये

इस्लामाबाद  – पाकिस्तानमध्ये तेहरिक-ए-लबाईक पाकिस्तान या पक्षाच्या समर्थकांनी लाहोर आणि अन्य शहरांमध्ये हिंसाचार घडवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पंजाब प्रांताने टीएलपीशी संबंधित सुमारे 100 मौलवींना संशयित दहशतवाद्यांच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे. पंजाब प्रांताच्या गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. डायरेक्‍टर इंटेलिजन्स कमिटीच्या शिफारशीनुसार या मौलवींची नावे दहशतवाद विरोधी कायद्याच्या चौथ्या परिशिष्टामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

पंजाब प्रांतातील बहुतेक सर्व पोलीस उपायुक्तांकडून अधिक शिफारशी आल्यामुळे या यादीतील नावे आणखी वाढण्याची शक्‍यताही आहे. या सर्व मौलवींची मालमत्ता गोठवण्यात आली असून राष्ट्रीय ओळख पत्र आणि बॅंक खाती बंद करण्यात आली आहेत. याशिवाय त्यांची नावे एक्‍झिट कंट्रोल लिस्टमध्ये टाकण्यात येणार आहेत.

दहशतवाद विरोधी कायद्याच्या चौथ्या परिशिष्टातील नावे संशयित दहशतवादी आणि कट्टरवाद्यांची असतात. स्थानिक पोलीस त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात. या व्यक्‍तींची चौकशी भविष्यात दहशतवाद विरोधी विभागाकडून केली जाते. तशी सूचना गृहमंत्रालयाने केली आहे. तेहरिक-ए-लबाईक पाकिस्तान पक्षावर बंदी घातल्याने या पक्षाची कोणतीही मालमत्ता, शेतजमीन अथवा शैक्षणिक संस्था विकता येणार नाहीत. गृहमंत्रालयाच्या सूचनेनंतर टीएलपीची कार्यालय सील केली जातील.
तेहरिक-ए-लबाईक पाकिस्तानचा प्रमुख साद हुसेन रिझवी याला 12 एप्रिलला लाहोरमध्ये अटक करण्यात आली आणि या पक्षावर बंदी घालण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.