जामखेड (प्रतिनिधी) – तालुक्यातील खर्डा वाकी व बाळगव्हाण येथे अवैद्यरित्या साठवून ठेवलेल्या वाळू साठ्यावर महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाई केली. यामध्ये पाच लाख रुपयांचा शंभर ब्रास वाळूसाठा जप्त केला आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील खर्डा वाकी व बाळगव्हाण या ठिकाणी तहसीलदार विशाल नाईकवाडे व सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या पथकाने संयुक्तरीत्या कारवाई केली. खर्डा येथील खैरी प्रकल्पातून लोणी, बाळगव्हाण, वाकी, सातेफळ या परिसरात खैरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी केली जाते. तसेच या परिसरातील गावात 100 ब्रास वाळूसाठा असल्याची माहिती तहसीलदार नाईकवाडे यांना मिळताच त्यांनी तत्काळ पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्याशी चर्चा करून सदर वाळूसाठे जप्त करण्याच्या दृष्टीने महसूल व पोलीस प्रशासनाचे पथक तयार केले व त्यानुसार शनिवार (दि. 4) दुपारी दोन वाजता सुरू झालेली ही कारवाई रात्री बारा वाजेपर्यंत चालू होती.
त्यामध्ये वाकी येथील गट नंबर 20 मध्ये कांतीलाल किसन जगताप, गणेश सतीश जगताप यांच्या शेतात असलेली 60 ब्रास वाळू साठा, बाळगव्हाण येथे 25 ब्रास वाळूसाठा, खर्डा येथे 15 ब्रास साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत तहसीलदार नाईकवाडे, निवासी नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, मंडळ अधिकारी नंदकुमार गव्हाणे, विठ्ठल माने, तलाठी सुखदेव कारंडे, विजय हजारे, विकास मोराळे, हरिभाऊ कुलकर्णी, भाऊसाहेब चौधरी, विजय कटारनवरे, साळवे, जोशी, काळे, विजय भोरे, बाळासाहेब भोगे व सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, पो.कॉ सानप, मस्के, कोळी, पो. कॉ. भिताडे, महिला पोलीस व्यवहारे आदी या पथकात सहभागी होते.
जप्त केलेला वाळूसाठा तहसील कार्यालयाच्या आवारात आणला तो शासकीय दराने लिलाव करण्यात येणार आहे. महसूल विभागाने मागील आठवड्यात वाळूमाफिया विरोधात धडक कारवाई करून सहा टॅक्ट्रर व दोन डम्पर वाळूसह जप्त करून धडक कारवाई केली होती. त्यातील तीन वाहनांकडून 4 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी वाळू माफियांविरोधात मोहीम उघडल्याने तालुक्यातील जवळा, फक्राबाद, पिंपरखेड तसेच सोनेगाव, धनेगाव, आगी परिसरातील अवैद्यरित्या वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.