जिल्ह्याच्या विकासाचे अजित पवारांनी केले नियोजन
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या सत्तांतराचे पडसाद सातारा जिल्ह्याच्या राजकारणात उमटले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जिल्ह्याला एक कॅबिनेट व एक राज्यमंत्रिपद मिळाले. आता वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याच्या नियोजन आराखड्यातील आधीचे 249 कोटी आणि 60 कोटी 51 लाख रुपये अतिरिक्त निधी देण्याचे निश्चित केले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाची उभारणी व पदनिर्मिती, जिल्हा क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी संग्रहालय, कास धरणाच्या भिंतीची उंची वाढविणे, आठ प्रमुख यात्रा स्थळांचा आराखडा, या कामांसाठी दीडशे कोटी रुपये देण्याची मेहेरबानी अजितदादांनी साताऱ्यावर केली आहे. या निधीतून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळण्याची शक्यता आहे. पुरवणी आराखड्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.
अजित पवार यांचा जिल्ह्याच्या राजकारणाचा दांडगा अभ्यास आहे. त्यांनी स्वतः जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी पेलली होती. त्यामुळे जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी देण्याचा त्यांचा कल असल्याचे दिसते. साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालय पूर्ण करायचा शब्द त्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना दिला असून त्यासाठी 80 कोटी रुपये निधी देऊन हा शब्द खरा केला आहे.
जिल्हा रुग्णालयाची इमारत वैद्यकीय शिक्षण व द्रव्य औषधी विभागाकडे हस्तांतरित होऊन सहा महिने उलटले तरी मनुष्यबळाअभावी वैद्यकीय महाविद्यालय आणि विशेषतः पदनिर्मितीचे काम पुढे सरकलेले नाही.
कास धरणाची उंची वाढविण्याच्या पहिल्या प्रकल्प आराखड्याला तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये जलसंपदा मंत्री असलेल्या अजित पवार यांनी मान्यता दिली होती. मात्र, त्यासाठी फडणवीस सरकारच्या कार्यकाळात काही निधी देण्यात आला होता. मात्र, हे काम गेल्या 11 महिन्यांपासून बंद असून ठेकेदारांचे 17 कोटी 69 लाख रुपये देणे शासनाकडून थकीत आहे. मूळचा 43 कोटी रुपयांचा हा प्रकल्प बारा वर्षांच्या दिरंगाईमुळे तब्बल 115 कोटींवर जाऊन पोहोचला आहे. यातील तीस टक्के कामे अजून झालेली नाहीत. याशिवाय पुसेगाव, औंध, शिंगणापूर, नाईकबा, मांढरदेव, फलटणचे श्रीराम मंदिर व म्हसवडचे सिद्धनाथ मंदिर या तीर्थस्थळांसाठी प्रत्येकी पाच कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला आहे.
या विकासकामांसाठी निधी मंजूर
जिल्हा क्रीडा संकुल……………………………………20 कोटी
वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृह व पदनिर्मिती…………….80 कोटी
छत्रपती शिवाजी संग्रहालय……………………………..12 कोटी
आठ यात्रा स्थळांचा विकास प्रत्येकी………………………5 कोटी
कास धरण उंची………………………….17.69 कोटी (थकित)