जानेवारीपासून अंमलबजावणी :”यूजीसी’चे महाविद्यालयांना निर्देश
पुणे – देशातील विद्यार्थ्यांचे स्वतःच्या फिटनेसकडे दुर्लक्ष होत असते. देशाची नवी पिढी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असायला हवी, या उद्देशाने येत्या जानेवारीपासून प्रत्येक महाविद्यालयाला रोज एक तास खेळासाठी राखीव ठेवावा लागणार आहे. याबाबतचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. तसेच, याबाबत महाविद्यालय व विद्यापीठांना फिटनेस क्लब सुरू करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे “यूजीसी’ने जारी केले आहेत.
रोजची किमान 45 ते 60 मिनिटे शारीरिक व्यायाम आणि खेळासाठी राखीव ठेवण्यात यावीत, असे परिपत्रक सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना “यूजीसी’ने पाठवले आहे. रोज एक तास फिटनेसचा ठेवता येईल असे प्रत्येक वर्गाचे शैक्षणिक वेळापत्रक बनवा, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. या तासामध्ये ऍथलेटिक्स, इनडोअर किंवा आऊटडोअर खेळ, योगा, सायकलिंग, स्विमिंग किंवा अन्य प्रकारचे शारीरिक व्यायाम विद्यार्थ्यांकडून करवून घेतले जाणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक महाविद्यालयाने फिटनेस क्लब स्थापन करावा अशाही सूचना यूजीसीने दिल्या आहेत.
प्राचार्य म्हणतात…
यूजीसीचा हा निर्णय स्वागतार्ह असला तरी त्याची अंमलबजावणी करता येईल का असा प्रश्न अनेक महाविद्यालयांना पडला आहे. शारीरिक आणि मानसिक फिटनेसला आम्ही महत्त्व देतो, पण आठवड्याला आम्हाला फक्त 25 तास मिळतात. त्यामुळे दर दिवशी एक तास खेळाला देणे कठीण आहे. आठवड्यातून एक तास मात्र निश्चित देता येईल, असे काही महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे म्हणणे आहे.