गेल्या वर्षी ८२ वर्षीय कमलाथल यांनी चक्क १ रुपये किंमतीला स्वादिष्ट इडली विकण्याचा उपक्रम सुरू केला आणि तेव्हा तो प्रसिद्ध झाला. कमलाथल यांना ‘इडली पाती’ किंवा ‘पातिमा’ म्हणून देखील ओळखले जाते. आज पुन्हा कमलाथल त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे चर्चेत आल्या. आणि यावेळी चर्चेचा विषय म्हणजे त्यांच्या इडलीची किमंत!
देशातील लॉकडाऊनमुळे, सर्व गोष्टींच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. अनेक जण या परिस्थितीचा फायदा देखील घेत आहेत. पण कमलाथल याला अपवाद आहेत. त्यांची स्वतःची परिस्थिती हालाकीची असून सुद्धा लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने त्यांनी बनवलेली इडली केवळ १ रुपयात विकण्याचा निर्णय घेतला आहे.
किंमत वाढविण्यास दिला नकार
कमलाथल म्हणाल्या कोरोना विषाणूनंतर सुरुवातीला परिस्थिती थोडी कठीण झाली होती, परंतु मी एक रुपयालाच इडली देण्याचा प्रयत्न करेन. मी बनवलेल्या इडलीची किंमत मी वाढवणार नाही. सद्य परिस्थितीमुळे बरेच लोक येथे येत आहेत. लॉकडाऊनमुळे येथे बरेच स्थलांतरित मजुरही आहेत. त्यामुळे लोकांची संख्या वाढत आहे. यावेळी, जे लोक मला मदत करीत आहेत आणि आवश्यक गोष्टी पुरवित आहेत, तेच वापरुन मी इडली बनवण्याचे काम करीत आहे.
बरेच लोक मदतीसाठी आले पुढे
या कठीण परिस्थितही १ रुपयाला इडली विकत असल्यामुळे बरेच लोक त्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. भरतियार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. कालिराज यांनी त्यांना अन्न व किराणा किट दान केली आहे. याशिवाय स्काउट्स आणि गाइड्स सदस्यांनी कमलाथलला जीवनावश्यक वस्तूही पुरविल्या आहेत. तसेच द्रमुकचे प्रमुख एमके स्टालिन यांनीही शनिवारी कमलाथल यांच्याशी चर्चा केली. तसेच त्यांना बोलावले आणि त्यांच्या पुढाकाराची आणि तो लोकांसाठी करत असलेल्या उदात्त कार्याबद्दल माहिती घेतली.
कमलाथल यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना सरकारकडून गॅस कनेक्शन मिळाले. यापूर्वी ते स्टोव्हचा वापर करीत होते. आता त्याची मोहीम गॅसवर सुरू आहे.