एक हात मदतीचा : दै.’प्रभात’च्या आवाहनाला पुणेकरांचा प्रतिसाद

साहित्य संकलन शिबिराला रविवारपासून सुरुवात

पुणे – सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी “दै. प्रभात’ आणि श्री तिरुपती नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या साहित्य, वस्तू संकलन शिबिराला रविवारी सुरुवात झाली. यानिमित्ताने दिलेल्या हाकेला साद देत शहराच्या विविध भागांतून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जीवनावश्‍यक वस्तू सुपुर्द करत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येत्या दोन दिवसांमध्ये सांगलीतील पूरग्रस्तांना ही मदत पोहोचविण्यात येणार आहे.

सांगली, कोल्हापूर आणि कोकणातील काही गावांमध्ये भयानक पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या गावांमध्ये पाणी शिरल्याने येथील जनजीवन पूर्णत: कोलमडून पडले आहे. नागरिकांना घरे रिकामी करावी लागल्याने आणि त्यांची घरे वाहून गेल्याने बेघर व्हावे लागले आहे. अद्यापही पाणी ओसरले नसल्याने तेथील नागरिकांना मदत पोहोचवणेही कठीण झाले आहे. त्यांना जीवनावश्‍यक गोष्टींची गरज आहे. त्यासाठीच मदत संकलनाचा उपक्रम शिबिराच्या माध्यमातून दै. “प्रभात’ आणि श्री तिरुपती नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत आयोजित केला आहे. यावेळी पतसंस्थेच्या वतीने किराणा वस्तुंचा समावेश असणाऱ्या 100 किट देण्यात आल्या.

या संदर्भात अधिक माहिती देताना पतसंस्थेचे सरव्यवस्थापक उमेश वाघे म्हणाले, “नागरिकांना महिनाभर पुरतील अशा किट आम्ही तयार करत आहोत. रविवारी सकाळपासून नागरिकांना मदतीसाठी ओघ कायम होता. रविवारपर्यंत 1,400 रुपयांचे सुमारे 150 पेक्षा अधिक किट जमा झाले आहेत. नागरिकांकडून धान्य, कपडे, खाद्यपदार्थ आदी गोष्टींची मदत केली जात आहे. सोमवारी देखील असाच उत्तम प्रतिसाद राहील, अशी आम्हांला आशा आहे. याठिकाणी जमा झालेल्या कपड्यांची संख्या पुरेशी असल्याने नागरिकांनी शक्‍यतो जीवनावश्‍यक गोष्टी आणि गृहोपयोगी साहित्य द्यावे’, असे आवाहन वाघे यांनी केले. या प्रसंगी रविवारच्या शिबिरात पतसंस्थेचे संस्थापक जुगलकिशोर पुंगलिया, चेअरमन संतोष चोपडा, चंद्रकांत कोल्हे, दै. “प्रभात’चे संदीप देसाई, संदीप आकुत, समीर कोडीलकर आदी उपस्थित होते.

आजही सुरू राहणार शिबिर
सोमवारी (दि.12) रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे. कसबा पेठेतील दारूवाला पुलाजवळील श्री राधाकृष्ण मंदिर देवस्थान येथे या वस्तू स्वीकारण्यात येणार आहेत.

काय देता येईल…
शिबिरामध्ये गहू, तांदूळ, चहा पावडर, डाळी, साखर, तेल, बॅटरी, मेणबत्त्या, माचिस बॉक्‍स, टुथब्रश, पेस्ट, फुड प्लेटस, साबण, ब्लॅंकेट, शाल, बेडशीट, मच्छरदाणी, मच्छर कॉईल, फुड पॅकेट्‌स, बिस्किट पुडे, ओआरएस पॅकेट्‌स, इस्टण्ट फूड पॅकेट, सॅनिटरी नॅपकिन्स आणि घरगुती वापरात येणाऱ्या वस्तू, इत्यादी वस्तू स्वीकारल्या जातील. मात्र, या शिबिरात रोख स्वरुपात मदत स्वीकारली जाणार नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)