शाळांच्या अडचणी सोडविण्यासाठी “एक दिवस शाळेसाठी’ उपक्रम

महसूल विभागातील अधिकारी शाळांना देणार भेटी

 

पुणे – जिल्हा परिषद शाळांच्या अडचणी सोडविण्यासाठी बड्या अधिकाऱ्यांचे सक्रिय योगदान असावे, यासाठी “एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात महसूल विभागातील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष शाळांना भेटी देवून त्याच्या मूल्यमापनाच्या नोंदणीचे रेकॉर्ड तयार करावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविणे, शाळांच्या पायाभूत सुविधांबाबतच्या समस्यांचे निराकरण करणे, विद्यार्थ्यांना विविध शासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी हा भेटींचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शाळांना भेट व मूल्यमापन यासाठी विभागीय आयुक्‍तांच्या स्तरावर कार्यक्रमांचे संनियंत्रण असणार आहे.

जिल्हाधिकारी ते तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिनस्थ विविध विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी, जिल्हा स्तरावरील अन्य शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले वर्ग 1 व 2 मधील अधिकारी यांनी एका वर्षात तीन शाळांना भेटी देणे आवश्‍यक आहे. काही अधिकाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस शाळेत भेट देणे आवश्‍यक आहे.

शाळेतच भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापन समिती, ग्राम पंचायत समिती, सरपंच यांच्याशी चर्चा करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याकडे कल कसा वाढेल याबाबत आवश्‍यक उपाययोजनाही राबवाव्या लागणार आहेत, असे आदेशही शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.