वाघळवाडी (वार्ताहर)- “आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळू, डेंग्यू व चिकुनगुनिया आजार टाळू’ असे म्हणत शालेय विद्यार्थ्यांनी पळशी, माळसाळवाडी (ता. बारामती) गावातून प्रभातफेरी काढून जनजागृती केली.
लोणी भापकर प्राथमिक आरोग्य केंद्र, पळशी ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने किटकजन्य रोग व साथरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत साथीच्या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी पळशी येथे जनजागृती आणि उपाय योजना करण्यात आल्या व माहिती देण्यात आली. यावेळी गावात कीटकजन्य सर्वेक्षण करून वापरावयाची पाण्याची भांडी (उदाहरणार्थ टाकी, रांजण, बॅरल, डेरे, फ्रिजच्या पाठीमागील भांडे) आठवड्यातून एकदा घासून पुसून कोरडे करावे, तसेच घराच्या आजूबाजूला असलेले टायर, रिकाम्या बाटल्या, रिकामे पत्र्याचे डबे, नारळाच्या करवंट्या यांची विल्हेवाट लावून परिसर स्वच्छतेचे आवाहन करण्यात आले.
यावेळी सरपंच बाबासाहेब चोरमले, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कोळेकर, संदीप कोळेकर, आनंदा माने, वसंत कोळेकर, बाबासाहेब सोनवलकर, गौरव कोळेकर, बाळासाहेब बंडगर, ग्रामसेविका दिपाली हिरवे, आरोग्य विभागातील आरोग्यसेवक रवी गायकवाड, आरोग्य सहायक ए. एम. गायकवाड, आरोग्य सेविका छाया शिंदे, वर्षा कडाळे, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खेत्रे, सर्व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.