मुलींचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी अनोखा उपक्रम
बुलढाणा : महिलादिनानिमित्त अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात मुलींना एक दिवसासाठी कलेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी सरकारी शाळेतील हुशार मुलींना निवडण्यात आले आहे. त्यांचे मनोधैर्य वाढावे हा यामागे उद्देश आहे.
याबाबत बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी सुमन चंद्र यांनी सांगितले की, शहरातील आणि जिल्ह्यातील हुशार मुलींना जिल्हाधिकारी कार्यालय कसे चालते, सामाजिक आणि इतर विषय कसे हाताळले जातात या संदर्भातील माहिती या उपक्रमामुळे मिळू शकेल. जिल्हा परिषदेच्या शाळातील या मुलींना महिलादिनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात येईल. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून विषय समजून घेऊन त्यावर निर्णय कसा घेतात हे समजावून सांगितले जाईल.
मुलींना संधी मिळाल्यानंतर त्या कोणते बदल घडवून आणू इच्छितात, याचा अंदाज येऊ शकेल. या परिसरातील मुलींचा आत्मविश्वास वाढेल. त्याचबरोबर आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा मिळेल. पुरुषांच्या जगामध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी काय करावे लागेल याचा अंदाज या उपक्रमामुळे मुलींना येईल, असे त्यांनी सांगितले. मुलींच्या मनामध्ये यशाची बीजे रोवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
मलकापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेतील नववीच्या वर्गात शिकणारी मारिया ही आज मुलगी जिल्हाधिकारी कार्यालयात आली. जनगणनेचे काम कशा पद्धतीने चालते या संबंधाच्या बैठकीत ती सहभागी झाली. जनगणनेचे काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेल्या प्रशिक्षणात ती सहभागी होणार आहे. प्रत्यक्ष कामकाज पाहिल्यामुळे त्यांचा अनुभव वाढेल आणि प्रशासन कसे चालते याची माहिती होईल. दिवसभर प्रशासकीय कामांमध्ये अनुभव घेत असताना त्यांना दैनंदिनी लिहिण्यास सांगण्यात आले आहे.
त्या आधारावर त्या आपल्या शाळेच्या ठिकाणी जाऊन अनुभव कथन करू शकतील. काल पुनम देशमुख नावाच्या आठव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून प्रशासकीय कारभार पाहिला. तिने वृत्त माध्यमांशी संवाद साधला आणि लोकशाही दिनामध्ये भाग घेतला. अवकाळी पावसामुळे घेण्यात आलेल्या बैठकीत ती सहभागी झाली. आपल्याला या उपक्रमामुळे मोठा आत्मविश्वास मिळाला असल्याचे तिने सांगितले. सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये पिंक विक साजरा केला जात आहे. या आठवड्यामध्ये जिल्ह्यातील महिलांना त्यांच्या आरोग्याबाबत जागृत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.