फेसबुक पेजवर सुविधा : सचित्र आणि सविस्तर माहितीमुळे जनजागृती
पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने अनुसूचित जाती घटकांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रम व कल्याणकारी योजनांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करुन दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून संस्थेच्या फेसबुक पेजवर ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे अगदी घरबसल्या या उपक्रमांची माहिती मिळणार आहे.
“बार्टी’ ही राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाची स्वायत्त संस्था असून, तिच्या विविध विभागांमार्फत ती एकूण 59 अनुसूचित जातीतील वंचित घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी विविध कल्याणकारी योजना व उपक्रम सातत्याने राबवते.
त्याचबरोबरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक न्याय व समतेवर आधारित वैश्विक व चीरकाल विचार आणि कार्य विविध माध्यमांद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचवून समाजात सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.
“बार्टी’च्या संकेतस्थळावर संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे. अन्य शासकीय विभागांना मागे टाकत, “बार्टी’ने स्वत:चे फेसबुक पेजदेखील सुरू केले आहे. यावर संस्थेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची सचित्र आणि सविस्तर माहिती अपलोड केली जाते. दररोज हजारो वाचक फेसबुक पेजला भेट देतात.
काय माहिती मिळते?
सोशल मीडियाद्वारे वाचकांपर्यंत पोहचलेल्या “बार्टी’ने आता सर्व उपक्रमांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करुन दिली आहे. त्यामध्ये स्पर्धा परीक्षा कक्ष, कौशल्य विकास, प्रशिक्षण कक्ष, संशोधन, विशेष कक्ष, जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र, समतादूत प्रकल्प, मूल्यमापन, शिष्यवृत्ती, अधिछात्रवृत्ती, सफाई कामगारांच्या मुला-मुलींची निवासी शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड, “बार्टी’च्या यशोगाथा अशा विविध बाबींचा समावेश आहे.
“बार्टी’च्या विविध विभागांची आणि यशस्वी उपक्रमांची एका दृष्टीक्षेपात मिळेल, अशी संक्षिप्त माहिती सोशल मीडियावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ती जास्तीतजास्त शेअर करून गरजू लोकांपर्यंत पोहोचवावी. या माध्यमातून पात्र लाभार्थींपर्यंत लाभ पोहोचविणे शक्य होईल.
– कैलास कणसे, महासंचालक, बार्टी, पुणे.