“एखाद्याच्या जीवाकडे केवळ आकडेवारी म्हणून पाहू शकत नाही”

वाढत्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीवर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष चिंतातुर

न्यूयॉर्क : जगामध्ये करोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेल्या देशांमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. करोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीमध्येही अमेरिका अव्वल स्थानी आहे. अमेरिकेमध्ये करोनामुळे मरण पावलेल्यांच्या संख्येने पाच लाखांचा टप्पा ओलांडला आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार करोनामुळे अमेरिक मरण पावलेल्यांची संख्या पाच लाख ७१ पर्यंत पोहचली आहे. अमेरिकेमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या दोन कोटी ८० लाखांहून अधिक झाली आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनाची साथ फारशी गांभीर्याने घेतली नाही आणि ट्रम्प प्रशासनाच्या काळामध्ये अमेरिकेत करोना संसर्गाचा वेगाने फैलाव झाला असा आरोप टीकाकाकारांकडून केला जातो. याचसंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्य जो बायडेन यांनीही आपली प्रतिक्रिया दिली असून एक देश म्हणून आपण अशाप्रकाच्या क्रूर भविष्यामध्ये वाटचाल करु इच्छित नाही असे म्हटले आहे.

अमेरिकेतील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाच लाखांच्या पुढे गेल्यानंतर राष्ट्राध्यक्षांनी सर्व मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. व्हाइट हाऊसमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी एक छोटे भाषणही दिले. “आपण एवढ्या दिर्घ काळापासून या साथीशी लढाई करत आहोत तर यापुढे रुग्णसंख्या वाढू न देणे ही आपली जबाबदारी आहे. एखाद्याच्या जीवाकडे आपण केवळ आकडेवारीचा भाग म्हणून पाहू शकत नाही,” अशा भावूक शब्दांमध्ये राष्ट्राध्यक्षांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.

अमेरिकेमध्ये हिवाळ्याच्या कालावधीमध्ये म्हणजेच २०२० च्या शेवटच्या महिन्यांमध्ये करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत होती. मात्र १२ फेब्रुवारीपासून अमेरिकेत रोज नव्याने आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या एक लाखांच्या खाली गेली आहे. अमेरिकेमध्ये दिवसाला दीड ते साडेतीन हजार लोकं करोनामुळे मृत्यूमुखी पडत आहेत. त्यातच आता करोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्याने भीती आणखीन वाढली आहे. नवीन करोना कसा वेगळा आहे आणि तो अधिक घातक असून शकतो का, त्यावर लसीचा परिणाम होईल का यासंदर्भात संशोधक संशोधन करत आहेत.

अमेरिकेतील १३ टक्के जनतेला करोना लसीचा पहिला डोस देण्यात आल्याची माहिती वॉशिंग्टन पोस्टने दिली आहे. चार कोटी ३० लाख जणांचे लसीकरण झाले असून या महिन्यामध्येच बायडेन यांनी ६० कोटी लसींचे डोस जूलैच्या अखेरीसपर्यंत उपलब्ध करुन देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क घालणे अत्यावश्यक करणे आणि सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करणे या दोन महत्वाच्या गोष्टी असल्याचे तज्ज्ञ सांगतात. अमेरिकेमध्ये करोनासंदर्भातील जागृतीच्या जाहिरातींमध्ये करोनामुळे झालेले मृत्यू हे श्वसनाचे आजार, बंदुकींमुळे झालेला हिंसाचार आणि कार अपघातांमधील मृत्यूंपेक्षा अधिक आहेत असं सांगण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.