यवत – प्रसिद्ध सिनेअभिनेते, दिग्दर्शक, निर्माता महेश मांजरेकर यांच्या कारचालकाने अचानक ब्रेक मारल्याने पाठिमागून धडक दिलेल्या कारचालकाला मांजरेकर यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैलास भिकाजी सातपुते ( रा. टेंभुर्णी, जि. सोलापूर) यांनी तक्रार नोंदवली आहे. ही घटना (दि.15) रात्रीच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील यवत हद्दीत घडली. यानंतर मारहाण केल्याचा हा व्हिडिओ तक्रारदाराने व्हायरल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश मांजरेकर हे कारने पुणे- सोलापूर महामार्गाने सोलापूरच्या दिशेने जात होते. तर कैलास सातपुते हे सुद्धा आपल्या कारने सोलापूरच्या दिशेने जात होते. दोन्ही मोटारी यवत हद्दीत आल्या असता मांजरेकर यांच्या कारचालकाने अचानक गाडी ब्रेक केली. त्यावेळी सातपुते यांच्या कारची मांजरेकर यांच्या कारला पाठीमागून धडक बसली.
या धडकेत मांजरेकर यांच्या मोटारीचे किरकोळ नुकसान झाले. त्यामुळे संतापलेल्या मांजरेकर यांनी कैलास सातपुते यांना शिवीगाळ व धमकी देत मारहाण केली. पोलिसांनी मांजरेकर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याची माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.