मुंबई : 2018 साली नालासोपाऱ्यात सापडलेली शस्त्रास्त्र आणि 2017 साली सनबर्न फेस्टिव्हलवरील हल्ल्याच्या कट प्रकरणी राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीला अटक केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोलकाता पोलिसांच्या विशेष टास्क फोर्सच्या मदतीने प्रताप जस्टीशतार हजारा उर्फ प्रताप हाजराला पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील नैनापूर येथून सोमवारी अटक करण्यात आली. त्याला येथे आणण्यात आले आणि कोर्टासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला 30 जानेवारीपर्यंत एटीएसच्या ताब्यात पाठविण्यात आले, असेही अधिकाऱ्याने सांगितले.
नालासोपारा शस्त्रास्त्र प्रकरणातील अन्य आरोपींना अटक केल्यापासून हाजरा फरार झाला होता.
इतर आरोपींना क्रूड बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण हजारा यांनेच दिल्याचे चौकशीत उघड झाले होते. डिसेंबर 2017 मध्ये पुण्यात झालेल्या सनबर्न संगीत महोत्सवादरम्यान काही कट्टर उजव्या विचारसरणीचे लोक त्यावर हल्ला करण्याचे नियोजन होते.
मात्र हा हल्ला होऊ शकला नव्हता. सनबर्न फेस्टिव्हलमुळे पश्चात्य संगीत आणि पाश्चात्य संस्कृतीची जाहिरात होत असल्याचे वाटल्याने त्यांनी सनबर्न फेस्टिव्हलला विरोध केला होता, असेही एटीएसला आढळले.
ऑगस्ट 2018 मध्ये मुंबईजवळील नालासोपारा आणि महाराष्ट्रातील इतर काही ठिकाणी छापा टाकल्यावर क्रूड बॉम्ब, स्फोटक पदार्थ, देशी बनावटीची पिस्तूले आणि चॉपर अशी शस्त्रे घातक शस्त्रे सापडली होती.
या प्रकरणात अटक झालेल्यांचा सनातन संस्थेसारख्या कट्टर संघटनांशी संबंध होता आणि त्यांना ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करायचे होते, असे एटीएसने डिसेंबर 2018 मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. यामध्ये अटक करण्यात आलेल्यात शरद कळसकरचाही समावेश आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या करणाऱ्यांपैकी दोघांपैकी एक कळसकर असल्याचा कथित आरोप आहे.