पिंपरी – मोहननगर, चिंचवड शिवसेना शाखेचे माजी प्रमुख विजय सर्जेराव सुर्वे (वय 40) यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. 10 मार्च रोजी मुळशी खुर्द येथे मानगाव ते पुणे या रस्त्यावर सुर्वे यांचा मृतदेह आढळला होता.
हर्षल अशोककुमार राठोड (वय 29, रा. निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. राठोड याच्यासह महमद नावाच्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक नामदेव कांबळे (वय 28, रा. मुळशी खुर्द, ता. मुळशी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सुरुवातीला या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
10 मार्च रोजी सकाळी स्थानिक नागरिकांना सुर्वे यांचा मृतदेह दिसला. आरोपींनी सुर्वे यांच्या तोंडावर, मानेवर व डोक्यात टणक बोथट हत्याराने मारून त्यांचा खून केला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी सुर्वे यांचा मृतदेह पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुळशी खुर्द गावाजवळ टाकला होता.