पुलवामा हल्ल्यासंबंधित एकास अटक

संग्रहित छायाचित्र...

चाकण परिसरात कारवाई : दोन महिन्यांपासून होता वास्तव्यास

पुणे – पुणे दहशतवाद विरोधी पथकाने बिहारमधील पटना येथे बेकायदेशीर हालचाल प्रतिबंधक कृत्य (युएपीए) गुन्ह्यातील एका आरोपीस चाकण परिसरातून अटक केली आहे. शरियत मंडल (वय 19, रा. पश्‍चिम बंगाल) असे अटक केलेल्याचे नाव असून मागील दोन महिन्यांपासून तो चाकण परिसरात राहात होता. पुणे आणि बिहार एटीएसच्या पथकाने संयुक्त कारवाई करत शरियत मंडल यास अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर करून ट्रांजिट रिमांड घेतली. त्याला बिहार एटीएस पटनाला घेऊन गेली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर बिहार एटीएसने बांग्लादेशातील दोन जणांना अटक केली असून त्यांच्याजवळ जम्मू-काश्‍मीरमधील सुरक्षा तैनती संबंधित माहिती असलेली कागदपत्रे मिळून आली आहेत. तसेच, त्यांचे बांग्लादेशी अतिरेकी संघटना इस्लामिक स्टेट बांग्लादेश (आइएसबी)सोबत संपर्कात राहून तरुणांना भरती करण्याची जबाबदारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सिरियामध्ये जाऊन इसिसमध्ये सहभागी होण्याचा त्यांचा कट होता व त्यादृष्टीने भारतातील विविध शहरांची रेकी करून अतिरेकी संघटनेत तरुणांची भरती करण्याचे काम ते करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

चाकण परिसरात मागील काही दिवसांपासून बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या एका बांग्लादेशी नागरिकास दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. सागरअली रफिकअली (22, रा. बांग्लादेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात चाकण पोलीस ठाण्यात परकीय नागरिक आदेश 1948 सहकलम 14, परकीय नागरिक कायदा 1946 आणि भादंवि कलम 465,467,468, 470, 471 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार उध्दव गर्जे यांनी फिर्याद दिली आहे. सागरअली हा कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय तसेच भारत-बांग्लादेश सिमेवरील मुलकी अधिकाऱ्यांचे लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात शिरला. त्यानंतर चाकण परिसरात बेकायदेशीररित्या राहून तसेच त्याने बनावट कागदपत्रे सादर करून भारत सरकारकडील आधारकार्ड आणि पॅनकार्ड काढले होते आणि एका खासगी कंपनीत काम करत होता. एटीएसला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आरोपी सागरअली यास ताब्यात घेऊन चाकण पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)