पुणे (प्रभात वृत्तसेवा) – तब्बल एक किलो सोने, तीन किलो चांदी आणि रोख रक्कम चोरून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट 1 कडून सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून बिबवेवाडी येथील सोवासवेरा सोसायटीत ही घरफोडी झाली होती, त्यामध्ये चोरट्याने 32 लाखांचा एवज घरफोडी केला होता.
मुश्तफा उर्फ बोना उर्फ पाटी शकील अन्सारी (वय 34, रा. ग्रिन पार्क शेजारी, कोंढवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण रमेश कांडपीळे (रा. सोवासवेरा अपार्टमेंट, बिबवेवाडी) हे कोथरुड येथे पाळीव कुत्रे खरेदी करण्यासाठी कुटूंबासह गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने बाल्कनीचे ग्रिल वाकवुन घरातील दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. त्याबाबत बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा समातंर तपास सुरू असताना, गुन्हे शाखेच्या युनिट 1 चे पोलिस अंमलदार अमोल पवार, अजय थोरात, इम्रान शेख यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार मुश्तफा उर्फ बोना अन्सारी हा त्याच्या बहीणीच्या नवऱ्याला भेटण्यासाठी कोंढवा खडीमशीन चौक येथे येणार आहे.
त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या आदेशाने पथकाने मुश्तफा अन्सारी याला ताब्यात घेतले. घरफोडीच्यावेळी तपासण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज आणि फोटो यातील वर्णन जुळते असल्याचे समोर आले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी त्याला बिबवेवाडी पोलीसांच्या ताब्यात दिले. सदर आरोपीवर पुणे शहरात खडक, वानवडी, कोंढवा, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन तसेच हैद्राबाद येथिल विजयवाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी दिवसा घरफोडीचे एकुण 18 गुन्हे दाखल आहेत.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एककडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड, अजय जाधव, पोलीस अंमलदार अमोल पवार, अजय थोरात, इम्रान शेख, तुषार माळवदकर अय्याज दडडीकर, महिला पोलीस अंमलदार रुक्साना नदाफ यांनी ही कारवाई केली.