पिंपरी – हिंजवडी येथे एका गॅस टाकीमधून दुसऱ्या गॅस टाकीमध्ये धोकाधायकरित्या गॅस भरत असताना पोलिसांनी छापा मारून एक जणाला अटक केली. तसेच त्याच्याकडून 13 गॅसच्या टाक्या व एक मोटारसायकल जप्त केली. ही घटना रविवारी (दि. 8) सव्वा तीनच्या सुमारास बोडकेवाडी हिंजवडी येथे घडली.
याप्रकरणी पोलिस शिपाई गोविंद हरीबा चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय ज्ञानू कांबळे (वय 26, रा. सोलापूर) याला अटक करण्यात आली आहे.
हिंजवडी येथील बोडकेवाडी याठिकाणी अवैधरित्या गॅस रिफलिंग होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून याठिकाणी छापा मारला असता, आरोपी अक्षय हा मानवी जीवितास हानी पोहचेल अशा पद्धतीने गॅसटाक्यांमधून दुसऱ्या गॅस टाकीत गॅस भरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी 48 हजार 28 रुपये किमतीचे 13 घरगुती वापराचे गॅस, 12 लहान पितळी रिफिलर, दोन लोखंडी रिफील पाईप, एक इलेक्ट्रिक वजन काटा तसेच 70 हजार रुपयांची एक मोटारसायकल जप्त केली आहे.