पिंपरी : वकिलाला केस चालविण्यासाठी फी म्हणून दिलेले पैसे परत मागत एकाने वकिलाला मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 13) दुपारी भुजबळ वस्ती, वाकड येथे घडली. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
चंद्रशेखर शिवाजी भुजबळ (वय 36, रा. भुजबळ वस्ती, वाकड) यांनी शनिवारी (दि. 13) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रवींद्र नेताजी भुजबळ (वय 30, रा. जमदाडे वस्ती, हिंजवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी रवींद्र याने त्याच्यावर असलेल्या अपहरणाची आणि घटस्फोटाची केस फिर्यादी चंद्रशेखर यांना चालविण्यासाठी दिली आहे. दरम्यानच्या काळात फिर्यादी यांनी आरोपीकडून चार लाख रुपये फी म्हणून घेतले होते. शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमरास आरोपी रवींद्र हा फिर्यादी चंद्रशेखर यांच्या घरात आला. “माझ्या सर्व केस तुला चालवायला दिल्या होत्या. त्या सर्व केसेसमध्ये तू विरुद्ध पार्टीला मॅनेज झाला. मी तुला दिलेले चार लाख रुपये सहा महिन्यांपासून मागत आहे. ते आजच्या आज परत दे, असे म्हणून आरोपीने फिर्यादी यांना मारहाण केली. आरोपीने फिर्यादी यांच्या बोटाला चावा घेतला. तसेच आरोपीने शिवीगाळ करत पैसे न दिल्यास फिर्यादी यांना जिवे मारण्याची धमकी दिली.