नागरिकांमध्ये कुतूहल : बाराखडी, रंग, दिशा, उजळणी पाठांतर
सोमाटणे – सध्या सोमाटणे आणि परिसरात चर्चा आहे ती म्हणजे दीड वर्षाचा “गूगल बॉय’ प्रत्युष पाटील याची.अवघ दीड वर्ष वय आणि इंग्रजी महिने, अ, ब, क, ड, मराठी-इंग्रजी भाषेतून सर्व दिशा, रंग, आठवड्याचे वार आणि बरंच काही तोंडपाठ आहे.
प्रत्युष बद्रीनारायन पाटील हा सोमाटणे येथील रहिवासी असून, वयाच्या अवघ्या अठराव्या महिन्यात त्याच्या अचाट बुद्धिमत्तेने सोमाटणे आणि परिसरातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे त्याच्या या विशेष गुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रत्युष याचे वडील शिरगाव येथील एका खासगी शाळेत शिक्षक आहेत. तर आई उच्चशिक्षित असून, गृहिणी आहे. प्रत्युष हा नऊ महिन्याचा झाल्यापासून त्याच्यात असणाऱ्या या विशेष बुद्धिमत्तेचा अनुभव त्याची आई अश्विनी पाटील यांना आला.
त्याला पहिल्याच वेळेस गायत्री मंत्र म्हणून दाखवला, तर त्याने दुसऱ्या दिवशी मंत्र म्हणून दाखवला जेव्हा काहीच शब्द बोलू शकणाऱ्या मुलाने गायत्री मंत्र म्हणून दाखवला म्हणजे यात काहीतरी “अचाट’ कौशल्य आहे. हे त्यांनी हेरलं आणि त्याला पुढील गोष्टीसाठी तयार करायचा असे त्यांनी ठरवले आणि आज प्रत्युष अठरा महिन्याचा झाला आहे. या वयातच तो शुभंकरोती, आठवड्याची नावे, एबीसीडी, महिन्याची नावे, ओंकार गुंजन, सर्व रंग, दिशा, श्लोक, दहा ते बारा बडबडगीते आणि त्यावरील कृती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची नावे, जंगली प्राणी, पाळीव प्राणी, राष्ट्रीय प्राणी, फूल, खेळ, राष्ट्रगीत, फोटोवरून सुमारे 50 नातेवाईकांची नावे आणि विशेष म्हणजे नुसत्या ध्वजावरून 48 देशांची नावे ओळखतो.
याशिवाय भूमितीमधील कोणाचे आकार, साहित्यावरून खेळाचा प्रकार आदी गोष्टींची माहिती त्याच्या तोंडपाठ आहेत. अवघ्या दीड वर्षाच्या वयात एवढी मोठी शब्द संपदा असणाऱ्या प्रत्युषची चर्चा होत आहे. सोमाटणेचा “छोटा गुगल बॉय’ म्हणून प्रत्युषची ओळख निर्माण झाली आहे.
प्रत्युष याच्याकडे असणाऱ्या गुणांची ओळख मला नवव्या महिन्यातच झाली होती. त्यामुळे मी त्याचा हा गुण वाढीस लागावा म्हणून प्रयत्न करायला सुरू केले आणि आज आपण पाहत आहेत त्याची प्रगती, जर प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलात विशेष गुण दिसला, तर तो हेरून त्याला वाढीस लागण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कारण जगातल्या प्रत्येक मुलात काहींना काही विशेष असतेच गरज असते ती म्हणजे त्याला ओळखायची.
– अश्विनी पाटील, प्रत्युषची आई.