कोल्हापूर(प्रतिनिधी) – कोल्हापुरात लाखो रुपयांचा भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कोल्हापुरातील तीन कंपनीवर एकूण चार ठिकाणी छापा टाकत भेसळयुक्त खवा आणि त्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ जप्त केले आहेत. शिरोळ तालुक्यातील या सर्व आस्थापना असून यावर छापा टाकून त्यांचा काळाबाजार उघड केला आहे.
ऐन दिवाळीत मिठाईची मोठ्या प्रमाणात मागणी आहे यातच बनावट खाव्याचा काळाबाजार उघड केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. या कारवाईत तीन ठिकाणी जवळपास दीड हजार किलो खवा जप्त करण्यात आला आहे तर 20 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
दिवाळीच्या तोंडावर सर्वत्र मिठाईची मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. अशातच मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीने भेसळयुक्त खवा बनवला जात असल्याची अन्न व औषध प्रशासनाला माहिती मिळाली. माहितीच्या आधारे येथील शिरोळ तालुक्यातल्या शिवरत्न मिल्क अँड मिल्क ऍग्रो प्रॉडक्ट, अमवा मिल्क अँड मिल्क एग्रो प्रॉडक्ट, गणेश मिल्क प्रॉडक्ट या आस्थापनांवर छापे टाकण्यात आले. त्यामुळे याठिकाणी ऐन दिवाळीत भेसळयुक्त खवा बनवला जात असल्याचे समोर आले.
यावेळी तीन अस्थापनांवर टाकलेल्या छाप्यात जवळपास दीड हजार किलो भेसळयुक्त खवा आणि एकूण 20 लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाची कोल्हापूरातील ही मोठी कारवाई मानली जात आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता व गुप्तवार्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर तसेच अन्न सुरक्षा अधिकारी शिर्के आदींच्या पथकाने केली.
कारवाईत कुठे किती साठा जप्त यावर एक नजर :
1) मे. शिवरत्न मिल्क अँड ऍग्रो प्रॉडक्ट, ताकवडे, ता. शिरोळ
499 किलो बनावट खवा, आणि खवा बनविण्याचे साहित्य असा एकूण 11 लाख 37 हजार 458 रुपयांचा साठा जप्त.
2) मे. अमवा मिल्क अँड ऍग्रो प्रॉडक्ट, अकिवाट, ता. शिरोळ
497 किलो बनावट खवा आणि खवा बनविण्याचे साहित्य असा एकूण 3 लाख 70 हजार 57 रुपयांचा साठा जप्त.
3) मे. गणेश मिल्क प्रॉडक्ट, मजरेवाडी, ता. शिरोळ
432 किलो खवा आणि खवा बनविण्याचे साहित्य असा एकूण 2 लाख 90 हजार 320 रुपयांचा साठा जप्त. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता इतर ठिकाणी ठेवलेला जवळपास 2 लाख 31 हजार 768 रुपयांचाही साठा जप्त करण्यात आला आहे.