करोना लढाईत दीड हजार माजी सैनिक

पुणे – आयुष्यातील एक महत्त्वाचा काळ लष्करी गणवेशात देशाच्या सीमेचे रक्षण करून देशसेवेतून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी करोनाकाळात पुन्हा आपल्यातील योद्ध्यांचे दर्शन घडविले आहे.

करोनाविरूद्धच्या लढ्यात राज्यातून 9 हजार 814 माजी सैनिक सहभागी झाले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील दीड हजार जणांचा समावेश आहे. “कोविड-19 योद्धा’ ही विशेष ओळख स्वीकारून हे माजी सैनिक विविध ठिकाणी आरोग्यसेवक, स्वयंसेवक, सुरक्षारक्षक अशा भूमिका निभावत आहेत.

“लष्करातील जवानांनी एकदा अंगावर वर्दी चढवली की त्यांच्या अंगातली लष्करी वृत्ती, लढाऊ बाणा अखंड सळसळतो, भले ते सेवानिवृत्त झाले तरीही’, याची अनुभूती करोना काळात पुन्हा पहावयास मिळाली. राज्यात अनेक ठिकाणी माजी सैनिकांनी स्वयंस्फूर्तीने करोनाविरुद्धच्या लढाईत उतरले आहेत. जिल्ह्यातही पुरंदर, बारामती, भोर, वेल्हा, जुन्नर, शिक्रापूर येथे माजी सैनिक चेकपोस्टवर संरक्षणासाठी जबाबदारी बजावत असताना जीवनावश्‍यक वस्तू पुरविण्याची दुहेरी भूमिका बजावत आहेत.

करोनाबाधित रुग्णाला रक्‍ताचा तुटवडा कमी पडू नये, याकरिता रक्‍तदान करणे, गावातील नागरिकांना आवश्‍यक ती मदत पोहोचवणे, नागरिकांना शिस्तीचे धडे देत त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करून घेणे अशी कामे करण्याबरोबरच काही संघटनांकडून आर्थिक मदतही केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.