सायकल ट्रॅकच्या सर्वेक्षणात दीड हजार नागरिकांचा सहभाग

  • आयुक्तांच्या मंजुरीनंतर ट्रॅक विकसित करणार

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या 27 लाखांच्या घऱात पोहचली आहे. त्यामुळे वाहनांचीही मोठी गर्दी रस्त्यावर होत आहे. शहरामध्ये खासगी वाहनांचा वापर कमी करून प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल ट्रॅक तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी नागरिकांचे ऑनलाइन सर्वेक्षण घेण्यात आले. त्यामध्ये दीड हजार नागरिकांनी सहभाग घेतला.

शहरातील मुख्य रस्ते प्रशस्त असले तरी अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. तसेच अनेक रस्ते अतिक्रमणनाने वेढले आहेत. अनेक रस्त्यांवर बेशिस्त वाहने पार्क केली जातात. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूककोंडी होते. केंद्र शासनाने देशातील सर्व स्मार्ट सिटीना नागरिकांची मते प्राधान्याने विचारात घेऊन सायकल ट्रॅक तयार करण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने नव्याने सायकल ट्रॅक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागरिकांनी जास्तीतजास्त सायकलचा वापर करावा. त्यामधून पर्यावरणाचे संवर्धन व्हावे हा त्यामागे हेतू आहे. तसेच खासगी वाहनांचा वापर कमीत कमी केला जावा यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले जाणार आहे. सायकल ट्रॅकसाठी पालिकेच्या पीसीएमसी स्मार्ट सारथी मोबाइल ऍपवर सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये सुमारे दीड हजार नागरिकांनी सहभाग घेतला.

विशालनगर डीपी रस्ता ते विप्रो सर्कल-हिंजवडी, पिंपळे सौदागर ते वाकड-कस्पटे वस्ती, सांगवी ते साई चौक, काळेवाडी फाटा ते कुदळवाडी चौक, बिर्ला रुग्णालय ते शिवाजी चौक, मोशी ते तळवडे आयटी पार्क या प्रस्तावित सायकल ट्रॅकचा पर्याय महापालिकेने सर्वेक्षणात दिला होता. नागरिकांनी सुचविलेल्या मार्गाचा विचार केला जाणार आहे.

या सर्वेक्षणासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दीड हजार नागरिकांनी आपली मते नोंदवली आहेत. त्यांनी माडलेली मते, सूचना, सल्ला, नवीन मार्ग यांचा अहवाल आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सादर केला जाणार आहे. त्यांच्या मंजुरीनंतर ट्रॅकचे काम सुरू करण्यात येईल.
– श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता.

Leave A Reply

Your email address will not be published.