दीड मेट्रिक टन प्लॅस्टिक जप्त; आतापर्यंतची मोठी कारवाई

लोणावळ्यात छापे 

पुणे – राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) प्लॅस्टिक बंदी कायद्यांतर्गत पुणे हद्दीतील आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई लोणावळा येथे शुक्रवारी केली. यात सुमारे दीड मेट्रिक टन प्लॅस्टिक माल जप्त करण्यात आला. तसेच यावेळी दोषी आढळलेल्या 17 दुकाने आणि एक साठवणूक केंद्रावर दंडात्मक कारवाई करत सुमारे 90 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

राज्यात जून 2018मध्ये प्लॅस्टिकबंदी कायदा लागू करण्यात आला होता. या कायद्यांतर्गत 50 मायक्रॉनपेक्षा कमी वजनाच्या तसेच पुनर्वापर करण्यायोग्य नसलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तूंची निर्मिती विक्री आणि वापर यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याअनुषंगाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने विविध कंपन्या आणि दुकाने यावर छापा टाक़ून बंदी असलेला प्लॅस्टिक माल जप्त केला जातो. तसेच या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईदेखील केली जाते. आतापर्यंत प्लॅस्टिकबंदी कारवाई अंतर्गत सुमारे दीड लाखांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे “एमपीसीबी’कडून सांगण्यात आले आहे.

लोणावळा येथे शुक्रवारी झालेल्या कारवाईअंतर्गत परिसरातील 200 दुकाने आणि एक साठवणूक केंद्र यांची पाहणी करण्यात आली. या कारवाईत मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर, तीन उपप्रादेशिक अधिकारी आणि लोणावळा नगर परिषदेचे अधिकारी यांच्यासहित 14 फिल्ड ऑफिसर सहभागी झाले होते. यामध्ये 200 पैकी 17 दुकाने आणि साठवणूक केंद्र येथे बंदी असलेला 1.5 मेट्रिक टन इतका प्लॅस्टिक माल आढळला. यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि इतर साहित्य यांचा समावेश आहे. या दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेला माल विल्हेवाटीसाठी लोणावळा नगर परिषदेकडे सोपविण्यात आले आहे.

शासन नियमांचे पालन करणे प्रत्येक व्यावसायिकाची जबाबदारी आहे. पर्यावरणाला हानी पोहचविणाऱ्या प्लॅस्टिकच्या वस्तूंबाबत सावधता बाळगली पाहिजे. अशा वस्तू खरेदी न करण्याला ग्राहकांनी प्रोत्साहन द्यावे तसेच व्यावसायिकांनीदेखील कायद्याचे पालन करावे, अथवा त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.
– दिलीप खेडकर, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

Leave A Reply

Your email address will not be published.