रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत दीडशे खेळाडूंचा सहभाग

पुणे – बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित 18 व्या श्री महेश्‍वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत राज्यभरातून एकूण 150 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा मनोहर मंगल कार्यालय, एरंडवणे, पुणे येथे दि. 25 व 26 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.

बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे यांनी सांगितले की, ही स्पर्धा फिडे, एआयसीएफ, एमसीए आणि पीडीसीसी यांच्या मान्यतेखाली होत असून, कोविडबाबतची सर्व काळजी या स्पर्धेदरम्यान घेण्यात येणार आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन, प्रत्येक खेळाडूला प्रत्येक फेरीच्या आधी सॅनिटायझर देण्याची व्यवस्थादेखील आयोजकांच्या वतीने करण्यात येणार आहे.

खेळाडूने सामन्याच्या वेळी मास्क लावणे हे अनिवार्य करण्यात आले आहे. 18 वर्षांवरील सहभागी सर्व स्पर्धकांचे लसीकरण प्रमाणपत्र प्रवेशपत्रिकेसोबत घेण्यात आले असून, स्पर्धेचे ऑफिशियल (आयोजक, आर्बिटर, स्वयंसेवक इत्यादी) यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ही स्पर्धा स्विस लीग पद्धतीने 9 फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे.

स्पर्धेत एकूण 60 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असून, यामध्ये विजेत्याला 15 हजार रुपये, उपविजेत्याला 10 हजार रुपये, तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला 7 हजार रुपये, चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूला 5 हजार रुपये आणि पाचव्या क्रमांकाच्या खेळाडूला 3 हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे कुंटे यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.