एकदा आपण दान दिलं की आपले कार्य संपतं. परंतु आता परिस्थितीत अशी आहे की ते दान त्या संस्थेकडे जाते की नाही हे पहाणेही महत्त्वाचे आहे. नाहीतर दानाला मध्येच पाय फुटून इतरत्र जाऊ शकते म्हणून हा लेख प्रपंच.
शीर्षक थोडं वेगळं वाटत असेल. कारण ज्यावेळी आपण दान म्हणून कोणाला देतो ते शक्यतो सत्पात्री असावे. म्हणजेच ज्याला दान देताय त्याला खरोखरच त्याचा उपयोग व्हावा, त्याला त्याची आवश्यकता असावी. तसेच एकदा दान दिल्यावर आपले कर्म झाले असे समजून आपण ते सोडून द्यावे म्हणजे या हाताचे त्या हाताला कळू नये असेही म्हटले जाते. आपण पाहतो की कित्येकदा वैयक्तिक असे दान देताना आपल्याला समजत नाही की त्याला दान देणार त्यास खरोखरच आवश्यक आहे की नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण शेवटी आपल्या ऐपतीप्रमाणे दान देत असतो कदाचित ते त्या घेणार्याला कमीही पडू शकत असेल किंवा त्याच्या आवश्यक तेएवढेही नसेल.
म्हणूनच आपण आपले दान नेहमी वेगवेगळ्या सामाजिक संस्था, एनजीओ, धार्मिक ट्रस्ट, वेगवेगळी मंदिरे किंवा वेगवेगळ्या स्वामींची तीर्थक्षेत्रे अशा ठिकाणी आपण देत असतो.
दान केल्यानंतर सदर संस्था किंवा ट्रस्ट त्याचा योग्य तो विनियोग करेल अशी अपेक्षा. आपण पाहतो कित्येक धर्मादाय संस्था, विविध मंदिरे किंवा सामाजिक संस्था असे वेगवेगळे ट्रस्ट विविध क्षेत्रामध्ये कार्य करीत असतात. मग त्यात शिक्षण, आरोग्य, बालविकास, वृद्धाश्रम, पर्यावरण, स्वच्छता अशा अनेक क्षेत्रात अनेक संस्था कार्य करीत असतात. अशा प्रकारच्या संस्था किंवा मंदिरे यांना दान दिल्याने आपल्याला एक दान दिले ते समाधान आणि आपल्या दिलेल्या दानाचाही व्यवस्थित उपयोग होत असतो. पण आता प्रश्न पडलाय की पैसा ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे काय काय घडू शकतं? विविध क्षेत्रामध्ये फोफावलेला भ्रष्टाचार तो पैशाच्या निमित्ताने होत असतो. मग वरील प्रकारच्या संस्थांमध्ये जर भ्रष्टाचारी लोक घुसले असतील तर पैशाचा अपव्यय होऊ शकतो.
यातून एवढेच सांगायचे की आपण करत असलेले दान व्यवस्थित त्या संस्थेस किंवा त्या मंदिराच्या ट्रस्टपर्यंत पोहोचते की नाही याची काळजी घेणे आता महत्त्वाचे ठरलेले आहे. विशेषतः अशावेळी रोख रकमेने दान देत असताना भ्रष्टाचार होण्याची शक्यता जास्त असते. हे सारे टाळण्यासाठी आपण आपले दान अधिकृत ठिकाणीच पोहोचते आहे की नाही ते पाहणे महत्त्वाचे ठरते.
सर्वप्रथम अशा प्रकारचे दान देत असताना ते शक्यतो ऑनलाइन पे, मनी ट्रान्सफर, डिमांड ड्राफ्ट किंवा त्या संस्थेच्या नावाने चेक देणे अशा सुरक्षित प्रकारे त्या संस्थेपर्यंत पोहोचू शकते. पण विविध मंदिर, मठ किंवा अनेक प्रकारच्या संस्था जेथे रोखीनेही रक्कम घेतली जाते व त्याची पावतीही दिली जाते. पण अशावेळी विशेष काळजी घेणे आवश्यक ठरते. तसे आपण लक्ष दिले नाही तर कदाचित ती रक्कम त्या मंदिर, ट्रस्ट किंवा त्या संस्थेला न जाता मधल्या लोकांच्या हाती जाण्याचा जास्त धोका असतो. कित्येक मंदिर संस्थानमध्ये दानपेठ्या ठेवलेल्या असतात. ज्या दानपेटीवर अधिकृतरित्या त्या ट्रस्ट किंवा संस्थेचे नाव असेल त्याच्यातच दान टाकावे नाहीतर काही ठिकाणी गाभार्यात ठेवलेल्या भेटीतील दान हे त्या पुजार्यांना दिले जाते. आपल्याला वाटते आपण पेटीत टाकले. याही ठिकाणी आता काही नियम झालेले आहेत. विशिष्ट चलनातील रकमेपेक्षा जास्तीचे चलन हे ट्रस्टकडे जाते व त्याच्या खालचे मंदिर पुजार्यांना जाते. पण जी रक्कम अधिकृतरित्या त्या संस्थेच्या पेटीमध्ये पडते ती त्या ट्रस्टला जाते त्यामुळे केवळ अशाच ठिकाणी रोख रक्कम दान करणे.
रक्कम देऊन त्याची रीतसर पावतीही घेता येते. येथे सावधानता बाळगणे आवश्यक आहे. सर्वप्रथम आपल्याला जी पावती देत आहेत त्या पावतीवर त्या संस्थेचा रजिस्ट्रेशन नंबर वगैरे लिहिलेला आहे की नाही ते तपासून पहावे. कित्येक ठिकाणी डुप्लिकेट पावत्याही दिल्या जातात. त्यामुळे आपण दान केलेली रक्कम त्या ट्रस्टपर्यंत पोहोचतच नाही.
दुसरे म्हणजे रोख रक्कम देताना आपल्याला पावती दिली जाते व त्या पावतीखाली कार्बन असतो व दुसरी कॉपी त्यांच्या पुस्तकात राहते. कित्येक वेळेला असा कार्बन पेपर फक्त आपले नाव आणि पत्त्याच्या ठिकाणी अर्धवट लावलेला असतो आणि रकमेच्या खाली कार्बनच नसतो. आपण रक्कम देऊन पावती घेऊन निघून जातो. नंतर तेथे कार्बन ठेवून त्यावर कमी रक्कम टाकून पैशाचा अपहार केला जातो. तिसरे महत्त्वाचे म्हणजे कित्येकदा पावती बुक दोन भागात असते म्हणजे अर्धी प्रत त्यांच्या पुस्तकात व अर्धी आपल्याला नाव पत्ता लिहून दिली जाते.
दोन महिन्यांपूर्वीचा अनुभव सांगतो. मी एका ठिकाणी अशी देणगी दिली. ती देत असताना त्याने पहिले त्यांच्या बाजूच्या पावतीवर माझे नाव, संपूर्ण पत्ता वगैरे लिहिला आणि नंतर मुख्य पावतीवर पुन्हा माझं नाव पत्ता लिहिल्यावर रक्कम विचारली. मी पाचशे एक रुपये सांगितल्यावर त्यांनी तसे माझ्या बाजूच्या पावतीवर लिहून त्यांनी पावती माझ्या हातात दिली. पण त्यांच्या बुकवर त्यांनी ती रक्कम टाकलीच नव्हती.
मी त्यांना सांगितले तुमच्या बाजूच्या पावतीवर तुम्ही अजून रक्कम टाकलेली नाही. त्यावर ते हासून अरे हो हो काय तुम्ही गडबडीत असाल म्हणून तुम्हाला पहिले मोकळं केलं मग माझ्यासमोर त्यांनी तेथेही 501 रुपये अक्षरी व आकड्यात लिहून टाकले. म्हणजे मी घाईघाईने पावती घेऊन गेला असतो तर त्यांच्या बाजूच्या भागात कदाचित त्यांनी शंभर रुपये किंवा पन्नास रुपये टाकले असते. मला वाटले असते की मी पाचशे एक रुपये देणगी दिली परंतु प्रत्यक्षात त्यांच्या संस्थेला ती पन्नास वा शंभर जी काही लिहिली असती तीच संस्थेत जमा झाली असती. त्यामुळे दान देताना आजच्या युगात ही खबरदारी घ्या.