‘लॉकडाऊन हो गया तो, मुश्‍कील हो जाएगा’; स्थलांतरित नागरिकांची पुणे रेल्वेस्थानकावर गर्दी

पुणे – लॉकडाऊन लागेल या भीतीने राज्यातील नागरिकांसह स्थलांतरित नागरिकांची मूळ गावी परतण्याची घाई सुरू असल्यामुळे पुणे रेल्वेस्थानकावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. परिवारांसह स्थानकाच्या आवारात लोंढेच्या लोंढे दाखल होत होते. त्यात बऱ्याच जणांनी मास्क लावले नव्हते. सामाजिक अंतराच्या नियमाचेही सर्रास उल्लंघन करण्यात येत होते.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर आता पुन्हा लॉकडाऊन लागू होईल अशी भीती वाढत आहे. मागील वर्षीच्या लॉकडाऊनमुळे अनेक स्थलांतरितांची मोठी गैरसोय झाली होती. तशी गैरसोय पुन्हा होऊ नये, म्हणून नागरिकांनी गाव गाठण्यास सुरुवात केली.

मागील वर्षभरापासून रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. या गाड्यांचे “कन्फर्म’ आरक्षण असणाऱ्या नागरिकांनाच “प्लॅटफॉर्म’वर जाण्याची मुभा आहे. मात्र नागरिक गाडीच्या नियोजित वेळेपूर्वीच स्थानकांच्या आवारात गर्दी करत आहेत. त्यामुळे आरक्षण खिडकीचा परिसर, स्थानकाच्या मुख्य गेटच्या परिसरातील जागांवर नागरिकांची गर्दी दिसत आहे. अनेक जण मुले, कुटुंबासह स्थानकात घोळक्‍याने बसल्याचे चित्र आहे. याशिवाय प्रवाशांनी स्थानकात सोडण्यासाठी येणाऱ्या रिक्षा, कॅब आणि खासगी वाहनांच्या देखील स्थानकाच्या आवारात रांगा लागत आहेत. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.

उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्या “फुल्ल’
पुणे-जम्मूतावी, पुणे-हावडा, पुणे-दरभंगा, पुणे-गोरखपूर, पुणे-मंडुआडीह, पुणे-लखनौ, पुणे-हटीया या गाड्यांचे आरक्षण 95 ते 100 टक्के झाले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

“लॉकडाऊन हो गया तो, मुश्‍कील हो जाएगा’
मागील वर्षी लॉकडाऊननंतर घरी जाताना गैरसोय झाली. आता पुन्हा करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. नियम देखील कडक करण्यात येत आहेत. लॉकडाऊन होण्यापूर्वी कुटुंबीय तरी घरी पोहोचतील. याशिवाय रोजगार मिळेल याची देखील खात्री नाही. त्यामुळे पुन्हा मूळगावी जात असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्‍त केली.

6 वाजण्यापूर्वी स्थानकात दाखल
संचारबंदीमुळे अनेक प्रवासी 6 वाजण्यापूर्वीच स्थानकात येण्यास प्राधान्य देत आहेत. शहराच्या विविध भागांतून रेल्वे स्थानकात येण्यासाठी वाहन उपलब्ध न होणे, रिक्षाचालकांकडून जादा भाडे आकारणे हे प्रकार घडत असल्याने नागरिक स्थानकात लवकर येत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.