नांदेड : जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी करत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. एक बार मैंने कमिटमेंट कर दी, तो मैं खुद की भी नहीं सुनता असे म्हणत शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला.
आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांवर काम करत आहोत. त्यांनी आम्हाला एखादा शब्द देताना आधी शंभर वेळा विचार करण्याचे शिकवले आहे. शंभर वेळा विचार करूनच मी एखादा शब्द देतो. त्यामुळे या मतदारसंघाच्या विकासाबाबत तुम्ही निश्चिंत रहा. लाडक्या बहिणींना मिळणारे पैसे हे कायम सुरू राहतील, असा दावा देखील एकनाथ शिंदे यांनी केला. आपल्या लाडक्या बहिणींनी आता राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असल्याचा दावा देखील शिंदे यांनी केला आहे.
मी देखील शेतकरी कुटुंबातून आलो आहे. सर्वसामान्य कुटुंबातील आलो आहे. त्यामुळे जे सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आले, त्यांना दीड हजार रुपयांची किंमत कळणार नाही. ती किंमत आम्हाला कळते. शेतकऱ्यांना देखील शून्य बिल दिले जात असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. आमच्यासारखे ऐकणारे सरकार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
राहुल गांधी आरक्षण रद्द करतील
काँग्रेसचे नेते राहुल गांधी विदेशात जाऊन आरक्षण रद्द करणार असल्याची भूमिका मांडतात. ते विदेशात जाऊन देशाची बदनामी करतात. हेच त्यांचे देशप्रेम असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आपल्या भारत देशाचे नाव जगभरामध्ये मोठे करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्याबाबत कौतुक करण्याचे सोडा तर उलट त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे काम विरोधक करत आहेत. मात्र केवळ माणुसकी म्हणून आपण काम करत असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.