“पुन्हा एकदा राष्ट्रीय रोजी रोटी आंदोलनाची गरज’

पिंपरी – आज महाराष्ट्राला स्वतंत्र राज्य दर्जा मिळून साठ वर्षे झाली. परंतु आजही महाराष्ट्रात बेरोजगारीने थैमान घातले आहे. शेतकरी हवालदिल झाला असून आत्महत्या करीत आहे अनेक उद्योगधंदे बंद अवस्थेत आहेत तर काही परराज्यात स्थलांतरित झालेले आहेत. असे असताना महाराष्ट्र दिनी हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करताना राज्यकर्त्यांना याचे किंचितही भान असल्याचे दिसून येत नाही, असे मत फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन अध्यक्ष अभय सोपानराव भोर यांनी व्यक्‍त केले. या वेळी पुन्हा एकदा राष्ट्रीय रोजी रोटी आंदोलनाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

संयुक्‍त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग असणाऱ्या आणि पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक असणाऱ्या सोपानराव भोर यांचे पुत्र अभय भोर यांनी सांगितले की, आज खरा महाराष्ट्र चंद्रमौळी झोपडीत आणि ग्रामीण भागात आहे. आज आपण परप्रांतीयांचा द्वेष करण्यापेक्षा त्यांची चिकाटी, जिद्द आणि मेहनत पाहून आपल्या तरुणांना उठ आणि जागा हो…कोणतेही छोटेमोठे व्यवसाय करण्याची लाज बाळगू नका… असे आवाहन करुन त्यांच्यातील गुणवत्ता जागी केली पाहिजे. त्यांना तांत्रिक शिक्षण देऊन महाराष्ट्रात नोकरीत सत्तर टक्के प्राधान्य महाराष्ट्रातील तरुण तरुणींना मिळालेच पाहिजे, असा आग्रह धरला पाहिला. लादण्यात आलेल्या अनेक प्रकारच्या करांमुळे महाराष्ट्रातील उद्योगधंदे कमी झाले आहेत.

आज महाराष्ट्रात मराठी सिनेमांना थिएटर सुद्धा उपलब्ध होत नाहीत. शेतकऱ्यांच्या भाजी पाल्याला आजही योग्य भाव मिळत नाही. शिक्षण क्षेत्राच्या लिमिटेड कंपन्या झाल्या आहेत. तरीही रोजगाराची शाश्‍वती देऊ शकेल, असे शिक्षण मिळत नाही. सर्वांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला सशक्त करण्याची आणि महाराष्ट्राला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाण्याची गरज आहे. संयुक्त महाराष्ट्रात चळवळीत शहीद झालेल्या जवानांचे बलिदान आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत समाविष्ट असणाऱ्या सैनिकांचे आत्मसमर्पण हीच खऱ्या अर्थाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत
काम करणाऱ्या शहिदांना श्रद्धांजली असेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.