पुणे – पुणे आणि भाजप यांचा संबंध विचार, संस्कार आणि आस्थेचा आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. पुण्यातील लाडक्या बहिणी आणि भाऊ यांना माझा प्रणाम, असे मराठीत म्हणत येथील जनतेचे अभूतपूर्व समर्थन मला मिळत आहे.
विमानतळ ते सभास्थळ अनेक लोकांनी गर्दी करून अभिवादन केल्याचे सांगून राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल, असा आशावाद मोदींनी व्यक्त केला. पालखी मार्गाचा उल्लेख करतानाही हा मार्ग बनवणे म्हणजे आमच्या वारकऱ्यांसाठी समर्पित सेवा आहे, असे सांगून ‘भाजप महायुती आहे, तरच गती आहे, आणि महाराष्ट्राची प्रगती आहे,’ असेही ते मराठीत म्हणाले.
देशात मोदी सरकार दूरदृष्टीमधून गतीने विकास करत आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की मोदी यांनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात वाढवणे या जागतिक बंदर निर्मितीसाठी निधी मंजूर केला. राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या. सरकारला मिळणाऱ्या निधीपैकी निम्मा निधी शासकीय पगारावर जातो आणि बाकी निधी विकासकामासाठी वापरला जातो. मात्र, महाविकास आघाडीने ज्या घोषणा केल्या, त्यासाठी तीन लाख कोटी रुपयांची गरज असून, ते कसा विकास साधणार, याबाबत स्पष्ट करावे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यावर विशेष प्रेम आहे, असे सांगून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आजपर्यंत मोदी सरकारने केलेल्या विकासाची माहिती दिली.
‘ज्या जिल्ह्यांनी अनेकांची जुळवली मने, त्या जिल्ह्याचे नाव आहे पुणे’, ‘आज देशात इतिहास घडत आहे नवा, कारण आजही देशात आहे मोदी यांचा करिश्मा’, अशा काव्यपंक्तींनी सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी भाषणाला सुरुवात केली. मला जागा मिळाल्या नाही तरी मी युतीसोबत असून आघाडीच्या उमेदवारांचा काटा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आठवले म्हणाले. उच्च-तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, विधान परिषदे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचीही भाषणे झाली.
आरक्षणाविषयी घोषणा देणाऱ्याची गच्छंती –
पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरू असताना मध्येच मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, नाहीतर ‘खींच के लेंगे’ अशी घोषणाबाजी करणाऱ्या एका कार्यकर्त्याला अन्य भाजप कार्यकर्त्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकेना. त्यामुळे साध्या वेषातील पोलिसांनी त्याला ताब्यात घेत, सभेच्या बाहेर नेले. त्यामुळे काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
कॉंग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे –
गेली सात दशके पाकिस्तान जी भाषा बोलत होता ती भाषा आज काँग्रेस बोलत आहे. जम्मू काश्मीर मध्ये पुन्हा कलम ३७० लागू करण्याची कॉंग्रेसची भाषा असून, देश किंवा महाराष्ट्र ते सहन करणार नाही, असा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुण्यातील प्रचार सभेत दिला.
पुणे जिल्ह्यातील २१ आणि सातारा जिल्ह्यातील दहा अशा एकूण ३१ विधानसभा मतदासंघातील महायुती उमेदवार प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार उदयनराजे , खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर, शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे, खासदार मेधा कुलकर्णी, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे, आरपीआय शहराध्यक्ष संजय सोनवणे, तसेच ३१ मतदारसंघातील उमेदवार उपस्थित होते. याप्रसंगी केशव शंखनाद ग्रुप यांनी शंखनाद केला.
जम्मू काश्मीरमध्ये गेली सात दशके संविधान लागू का नव्हते, याबाबत कॉंग्रेसने भूमिका मांडावी, असे आव्हान मोदी यांनी दिले. तसेच जनतेने मोदींना सेवेची संधी दिली म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये संविधान प्रथमच लागू झाले आहे. आम्ही कलम ३७० जमिनीत गाडले. या कलमाने याआधी जम्मू-काश्मीरला देशापासून वेगळे ठेवले, दहशतवादाला प्रोत्साहन दिले. आज काश्मिरच्या लाल चौकात तिरंगा डौलाने फडकत असून, दिवाळी देखील तिथे साजरी झाली, असे मोदी म्हणाले.
काँग्रेसला केवळ सत्ता हवी होती त्यामुळेच त्यांनी तुष्टीकरणाचा खेळ खेळला. त्यांनी देशाचे विभाजन केले. दलीत, आदिवासी, मागासवर्गीय यांना तोडण्याचा प्रयत्न केला. जातीजातींमध्ये वाद निर्माण करून त्यांना कमजोर करून आरक्षण काढण्याचे काम काँग्रेस करत आहे. महाराष्ट्रात संविधानाची कोरी पुस्तके वाटप केली जात आहेत. त्यामुळे जनतेने सावध राहावे, असे सांगून हम एक रहेंगे तो सेफ रहेंगे अशी घोषणा मोदी यांनी दिली.
काँग्रेसच्या कट कारस्थानाचा एक भाग कर्नाटकमध्ये दिसून येत आहे. तेथे सरकार बनले परंतु. काँग्रेसने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. केवळ घोटाळे समोर येत आहेत. या लुटीचा पैसा महाराष्ट्रात पाठवून निवडणूक लढवली जात आहे. राज्याला वाचवण्यासाठी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे, असे आवाहन मोदींनी केले.
…..त्यांची स्तुती करून दाखवावी
विदेशी गुलामगिरी मानसिकता असलेल्या काँग्रेसने महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केला आहे. वीर सावरकर यांना सतत ते शिव्या देतात. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या तोंडून त्यांनी वीर सावरकर, स्व. बाळासाहेब ठाकरे यांची स्तुती करून दाखवावी, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणातून दिले.
मोदींनी पवारांवरील टीका टाळली –
महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी आले आणि त्यांनी महाराष्ट्रातील आघाडीचे नेते शरद पवार यांच्यावरील टीका टाळली, यामुळे उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. महाराष्ट्रातील राजकारणात पवार विरोधी पक्ष हे कायमच त्यांच्यावर टीका करत आले आहेत. या आधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत पुण्यात मोदींनी पवारांना भटकती आत्मा असे म्हटले होते. त्याचा उलटा परिणाम निवडणुकीत दिसला. विरोधकांनी त्याचेच राजकारण केले आणि पवारांना सहानुभूती मिळाली. यावेळी मोदींनी केवळ कॉंग्रेस आणि त्यांचे समर्थक एवढाच उल्लेख केला आणि पवारांचे नाव घेणे किंवा त्यांच्यावर टीका करणे पूर्णपणे टाळलेच.
मोदी आणखी काय म्हणाले…
– मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची अनेक वर्ष मागणी झाली पण काँग्रेसने कधी त्याची पूर्तता केली नाही. आम्ही हे काम करून आमची जबाबदारी निभावली आहे.
– महायुती सरकार आगामी काळात वेगाने विकास करेल. पुण्यात पुढील पाच वर्ष विकासाची नवीन उड्डाण करण्याची असतील.
– परकीय गुंतवणूकीमध्ये रेकॉर्ड ब्रेक गुंतवणूक देशात झाली असून गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र आघाडीवर आहे.
– पालखी मार्ग देखील वेगाने निर्माण होत असून, ११ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. आमच्या वारकऱ्यांसाठी ही समर्पित सेवा आहे.