फिर एक बार मोदी सरकार – भाजपची यंदाची निवडणूक घोषणा

नवी दिल्ली – फिर एक बार मोदी सरकार अशी यंदाची भाजपची निवडणूक घोषणा निश्‍चीत करण्यात आली आहे. भाजपचे नेते अरूण जेटली यांनी आज ही माहिती दिली. त्यांनी भाजपची प्रचार व्हिडीओ चित्रफितही आज जारी केली. आजच कॉंग्रेसची निवडणूक घोषणा जाहीर करण्यात आली असून भाजपनेही आजच ही घोषणा देऊन आपली रणनिती स्पष्ट केली आहे. पक्षाने यंदाच्या प्रचाराचे थिम सॉंगही प्रसारीत केले आहे.

गेल्यावेळी अब की बार मोदी सरकार ही घोषणा भाजपने दिली होती. त्याला सन 2014 साली मोठा प्रतिसाद मिळाला होता. या पार्श्‍वभूमीवर यंदा भाजपची घोषणा काय असेल या विषयी औत्स्युक्‍य होते. अरूण जेटली यांनी सांगितले की, मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत विकासाची मोठी कामे केली आहेत अनेक महत्वाच्या योजना मार्गी लावल्या आहेत. काम करणारे सरकार अशीच आमची प्रतिमा असून त्याच आधारावर आम्ही फिर एक बार मोदी सरकारची घोषणा निश्‍चीत केली आहे असे जेटली म्हणाले. भाजप सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे न घाबरता मोठे निर्णय घेणारे सरकार हे आहे त्याचाही आम्ही प्रचारात वापर करणार आहोत असे जेटली म्हणाले. प्रामाणिक आणि पारदर्शक सरकार अशीही आमच्या सरकारची वैशिष्ट्ये आहेत. तीही आम्ही प्रचारात ठासून वापरणार आहोत असे ते म्हणाले. सरकारच्या कामाची माहिती देणाऱ्या व्हिडीओ चित्रफीती आणि आकर्षक जाहींरातीही आम्ही तयार केल्या असून त्या दूरचित्रवाणी वाहिन्या, वृत्तपत्रे आणि पक्षाच्या अन्य प्रचार यंत्रणांमार्फत लोकांपर्यंत पोहचवणार आहोत असेही त्यांनी सांगितले.

भाजपने सरकारच्या माध्यमातून या आधीच मोठी जाहींरातबाजी केली आहे. त्याला जोडून आता पक्षाची स्वतंत्र प्रचार यंत्रणा आणि जाहीराती कल्पक स्वरूपात सादर करून लोकांना आकर्षित करण्याचा कसोशिचा प्रयत्न या निमीत्ताने भाजपकडून करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.