नवी दिल्ली : मध्य प्रदेशमध्ये एका घटनेच्या व्हिडीओमुळे राजकारण वेगळ्याच वळणावर जात आहे. शिवराज सरकारमध्ये मंत्री असलेल्या कुंवर विजय शाह यांचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मंत्री कुंवर विजय शाह एका मुलीकडे लक्ष ठेवण्याबद्दल एका महिला अधिकाऱ्याला सांगत आहेत. याच दरम्यान त्यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकारण तापलेआहे. “ही विद्यार्थिनी मुख्यमंत्र्यांच्या जातीची आहे, म्हणून हिच्याकडे लक्ष द्या” असे आदेशच त्यांनी त्या अधिकाऱ्याला दिले आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला असून काँग्रेसनेही त्यावर टीकेची झोड ठवली आहे. मंत्री कुंवर विजय शाह यांनी महिला अधिकाऱ्याला ही मुलगी मुख्यमंत्र्यांच्या जातीची आहे, त्यामुळे हिच्याकडे लक्ष द्या असे म्हटले आहे. गुरुवारी मध्य प्रदेशचे वनमंत्री कुंवर विजय शाह नरसिंहपूरच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान एके ठिकाणी मंत्री नागरिकांच्या समस्या ऐकत होते. त्यावेळी एक विद्यार्थिनी स्वत:ची अडचण घेऊन त्यांच्या जवळ आली. तेव्हा मंत्री शाह यांनी उपस्थित महिला अधिकाऱ्याला तिची समस्या नोंदवून घ्यायला सांगितले.
काश मध्यप्रदेश का हर व्यक्ति मुख्यमंत्री जी की जाति का होता या फिर प्रदेश का हर नागरिक अपने नाम के आगे मुख्यमंत्री जी की जाति लिखवा लेता तो शायद प्रदेश के मंत्रीगण उसका इसी प्रकार विशेष ध्यान रखते….? pic.twitter.com/PRYvbvucsy
— Narendra Saluja (@NarendraSaluja) August 28, 2021
समस्या सांगण्यापूर्वी मंत्र्यांनी विद्यार्थिनीला तिचे नाव विचारले. ज्यानंतर विद्यार्थिनीने आपलं नाव शिवानी किरार असल्याचे सांगितले. जसं विद्यार्थिनीने आपले नाव सांगितले त्यानंतर मंत्र्यानी विद्यार्थिनीच्या नावाचा उल्लेख करीत ती मुख्यमंत्र्यांच्या जातीची असल्याचे महिला अधिकाऱ्याला सांगितले. म्हणून हिची काळजी घ्या. मंत्र्यांच्या या विधानानंतर तिथे उपस्थित असलेले अनेक अधिकारी हसू लागले. ज्यानंतर मंत्री देखील आपलं हसू रोखू शकले नाही. या दरम्यान तेथे उभे असलेल्या व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे.
कुंवर विजय शाह यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर काँग्रेसने जोरदार निशाणा साधला आहे. नरेंद्र सलूजा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करत जोरदार टीका केली आहे. “मध्य प्रदेशची प्रत्येक व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या जातीची असती तर किंवा मग प्रत्येकाने आपल्या नावासमोर मुख्यमंत्र्यांच्या जातीचा उल्लेख केला तर राज्यातील मंत्री त्यांच्याकडे अशाच प्रकारे विशेष लक्ष ठेवतील?” असे म्हटले आहे.