माॅस्को – सोशल मीडियावर वेगवेगळ्या चॅलेंजेस चे ट्रेंड सुरू असतात. असंच एक चॅलेंज एका 60 वर्षीय व्यक्तीला महागात पडलं असून लाईव्ह स्ट्रीम सुरू असतानाच एका रशियन व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चॅलेंजवेळी लाईव्ह असलेले सर्वच जण हैराण झाले आहे.
Yuri Dushechkin या रशियन व्यक्तीने युट्यूबवर वोडका पिण्याचं चॅलेंज घेतलं. वोडका पिण्याचा हा संपूर्ण प्रकार यूट्यूबवर लाईव्ह सुरू होता. तो व्यक्ती लाईव्ह सुरू असतानाच 1.5 लीटर वोडका प्यायाला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेवेळी लाईव्ह पाहत असेलेल्या सर्वच युजर्समध्ये भीतीचं वातावरण आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, एका यूट्यूबरने या रशियन व्यक्तीला वोडका पिण्याचं चॅलेंज दिलं होतं. हे करण्यासाठी त्याला पैशांची ऑफरही दिली होती. सोशल मीडियावर Thrash Streams किंवा Trash Streams असे ट्रॅश ट्रेंड होत असतात. जिथे युजर्सला पैशांच्या बदल्यात कोणतेही अपमानास्पद कृत्य किंवा विचित्र स्टंट करण्याचे आव्हान केले जाते. तसेच या प्रकारचे स्टंट पाहण्यासाठी अनेकजण लाईव्हही असतात.
स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, जवळपास दीड लीटर वोडका पिल्यानंतर हा व्यक्ती लाईव्ह स्ट्रिममध्येच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना गेल्या आठवड्यात Smolensk शहरात घडली आहे. या व्यक्तीने पैशांच्या बदल्यात दारू पिण्याचं आणि गरम साॅस पिण्याचं आव्हान स्विकारलं होतं. रशियन संसदेच्या सदस्यांनी अशा प्रकारच्या सोशल मीडियावरील हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या Trash Streams वर बंदी आणण्याची मागणी केली आहे.