शशिकांत भालेकर
पारनेर विधानसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेची उमेदवारी आ. विजय औटी यांनाच मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यात विखे परिवाराला मानणारे कार्यकर्ते भाजपत आल्याने तसेच राष्ट्रवादीचे नाराज कार्यकर्तेही भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजपची ताकद तालुक्यात वाढली आहे. या वाढलेल्या ताकदीमुळेच भाजपकडून स्वतंत्र उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते. त्यातच शिवसेनेकडून नगर तालुक्यातील जि. प. सदस्य संदेश कार्ले यांनीही उमेदवारी मागीतली आहे. ऐनवेळी त्यांना भाजपने ताकद दिल्यास तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
माजी आमदार नंदकुमार झावरे यांचा सर्व गट व नव्यानेच भाजप प्रवेशाची घोषणा केलेले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुजित झावरे त्याचबरोबर विखे यांना मानणारा तालुक्यातील गट व पूर्वीचे भाजपमध्ये असणारे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे हे सर्व भाजपमध्ये असल्याने तालुक्यातील भाजपची ताकद सध्या वाढली आहे. त्यामुळे युती झाली नाही, तर भाजपसाठी तालुक्यामध्ये ती संधी असणार असल्याचे भाजपचे इच्छुक उमेदवार मानतात. मात्र युती झाली तर त्याचा फायदा शिवसेनेचे औटींना होऊ शकतो किंवा विखे यांनी ऐन वेळेस यातील कोणाला अपक्ष उमेदवारीसाठी पाठिंबा दिला, तर मात्र अपक्ष देखील तालुक्यात चर्चेचा विषय ठरू शकतो. हा मतदारसंघ हा सर्वांत मोठा मतदारसंघ आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना कमी कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
तालुक्यात शिवसेनेच्या वतीने विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यातच जि. प. सदस्य संदेश कार्ले यांनी देखील सेनेकडे उमेदवारीचा दावा केला आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये शिवसेनेत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. कार्ले पक्षाच्या वरिष्ठांच्या संपर्कात आहेत. जर उमेदवारी नाकारली, तर ते अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्यामुळे सेनेअंतर्गत मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे. कार्ले यांना मानणारा नगर तालुक्यात मोठा वर्ग आहे. त्यामुळे नगर तालुक्यातील पुढाऱ्यांनी एकच उमेदवार देण्याचं ठरवलं, तर कार्ले मोठी मते घेतली. त्याचा फटका कोणत्या उमेदवाराला बसेल, हे मात्र निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. त्यातच भाजप सेना युती नाही झाली तर कार्ले हे भाजपच्या देखील सध्या संपर्कात आहेत.
त्याचबरोबर विखे कुटुंबाशी असणारे त्यांचे संबंध, यामुळे त्यांना भाजपकडून ऐनवेळी पुढे केले जाऊ शकते किंवा अपक्ष म्हटलं तरी त्यांना बळ दिले जाऊ शकते. अशा वेळेस नगरमध्ये जवळपास एक लाखाहून मतदार असल्याने त्या भागातील उमेदवार देखील करिष्मा करू शकतो. राष्ट्रवादीकडून नीलेश लंके यांचे नाव निश्चित मानले जात असल्याने त्यांनी यापूर्वीच प्रचारास प्रारंभ केला असून, पहिली फेरी पूर्ण केली आहे. त्यांना देखील तिरंगी लढतींमध्ये मत विभाजनाचा फटका बसू शकतो, अशी शक्यता नाकारता येत नाही. गेली पंधरा वर्षे आ. औटी यांची सत्ता तालुक्यावर असल्याने हक्काचा मतदार त्यांनी देखील तयार केलेला आहे. हा मतदार आमदार औटी यांच्या बाजूने राहू शकतो व लंके यांच्या व तिरंगी लढतीतील उमेदवाराची मते विभागली जाऊ शकतात, हा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.
कार्लेंच्या मुख्यमंत्री भेटीची चर्चा
एक महिन्यापूर्वी शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची लोणी येथे संदेश कार्ले यांनी भेट घेतली होती. त्या भेटी वेळेस पारनेर नगर मतदारसंघाबाबत काही पडद्याआड खलबत्ते झालेत का? त्यावेळी खासदार सुजय विखे देखील उपस्थित होते. त्या भेटीदरम्यान पारनेर-नगर मतदारसंघाबाबत देखील काही चर्चा झाली असू शकते. कारण कार्ले हे शिवसेनेकडून अनेक दिवसांपासून विधानसभेच्या तयारीत आहेत. त्यांचं मुख्यमंत्र्यांना भेटणं व हे विधानसभेसाठी भाजपकडून चाचपणी तर नव्हती, ना याबाबत तर्क लावला जात आहे.