पुणे – कर्नाटकातून पुणे शहरात आलेल्या एका टॅव्हल एजंटला रात्री दोनच्या सुमारास मारहाण करत लूटण्यात आले. त्याच्या हातातील चार सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल, पाकिट असा एक लाख ८० हजाराचा ऐवज लूटण्यात आला.ही घटना बुधवार पेठेत घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एका रिक्षा चालकासह दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार कर्नाटक मंगलूर येथे रहाणाऱ्या ४३ वर्षीय फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनूसार फैय्याज मोहंमद गौस शेख (२६, रा.दांडेकर पुल) आणि वैभव उदय धोत्रे (३२, रा.स्वारगेट) यांना अटक करण्यात आली आहे. शेख रिक्षा चालक असून धोत्रे हा फिरस्ता आहे.
फिर्यादी एका ट्रॅव्हल कंपनीत एजंट म्हणून काम करतो, त्याच्या बहिणीचे मुंबई येथे निधन झाल्याने तो मंगलू येथून निघाला होता. पुण्यात आल्यावर तो पत्नीसह अरोरा टॉवर हॉटेलमध्ये उतरला. यानंतर रात्री दिडच्या सुमारास सिगरेट पिऊन येतो असे सांगून तो हॉटेलमधून बाहेर पडला. त्याने रिक्षा चालकास पुणे शहर फिरविण्यास सांगितले. यानंतर रिक्षा चालकाने रिक्षा बुधवार पेठेत आणून यहॉं सबकुछ मिलता है असे सांगित, त्याला उतरवले.
फिर्यादी खाली उतरुण सिगरेट पीत असतानाच दोघे आरोपी तेथे दाखल झाले. त्यातील एकाने हातातील अंगठी जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध करताच दुसऱ्याने दोन्ही हात धरुन ठेवले. दोघांनीही चार अंगठ्या, मोबाईल आणि पाकिट काढून घेत पळ काढला. यानंतर घाबरलेला फिर्यादी पुन्हा हॉटेलमध्ये गेला. पत्नीशी चर्चा केल्यावर त्याने फरासखाना पोलिसांत तक्रार दिली. तांत्रीक तपासात दोन्ही आरोपी निष्पन्न झाले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे करत आहेत.