मुंबई – दिग्दर्शक व अभिनेते महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजनची नवी मालिका “दख्खनचा राजा ज्योतिबा’ आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेचं कोल्हापूर चित्रनगरीत चित्रिकरण सुरु झालं असून, काही दिवसांपूर्वीच मालिकेचा भूमिपूजन सोहळा कोल्हापूर मध्ये पार पडला. यावेळी महेश कोठारे, आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे आदी होते उपस्थित होते.
तीन-चार महिन्यांनंतर अटीशर्तींच्या आधारावर पुन्हा एकदा चित्रपटांचे आणि मालिकांचे शूटिंग सुरू झाले आहे. त्यामुळे आता बऱ्याच नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दख्खनचा राजा जोतिबाच्या महात्म्यावर आधारित “दख्खनचा राजा जोतिबा’ ही मालिका असणार आहे. नुकतंच या मालिकेचा ऑफिशल टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यापूर्वी देखील कोठारे व्हिजन निर्मित झी मराठी वरील जय मल्हार मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. जय मल्हार मालिकेतून जेजुरीच्या खंडोबाची कथा प्रेक्षकांना पहायला मिळाली होती.
दरम्यान, “दख्खनचा राजा जोतिबा’ या मालिकेत मध्यवर्ती भूमिका, अर्थात ज्योतिबा कोण साकारणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. नवोदित अभिनेता ‘विशाल निकम’ मालिकेत ज्योतिबाच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी विशालने खुप मेहनत घेतली आहे. ज्योतिबाची भूमिका साकारण्यासाठी विशालने 20 दिवसात 12 किलो वजन कमी केल्याचे सांगितले आहे. 23 ऑक्टोबर पासून संध्याकाळी 6:30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर ‘दख्खनचा राजा जोतिबा’ ही मालिका प्रसारित होणार आहे.