विंडीज फॉलोऑनच्या मार्गावर

वेलिंग्टन -केल जेमिसनच्या भेदक गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी अक्षरशः लोटांगण घातल्याने दुसऱ्या कसोटी सामन्यातही ते फॉलोऑनच्या मार्गावर आहे. दुसऱ्या दिवसाअखेर न्यूझीलंडने पहिल्या डावात 460 धावा केल्यानंतर विंडीजला 8 बाद 124 धावांवरच रोखले. 

विंडीजला फॉलोऑन टाळण्यासाठी आणखी 136 धावांची आवश्‍यकता आहे. दरम्यान, गेल्या पाच कसोटी सामन्यांमध्ये जेमिसनने दुसऱ्यांदा पाच विकेट्‌स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने दोनदा अर्धशतक आणि 40 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

केल जेमिसनने त्याच्या पहिल्याच षटकात सलग दोन चेंडूत दोन बळी घेतले. यानंतर पुढच्याच चेंडूवर जोरदार पायचितचे अपील केले. परंतु पंचांनी ते नकारल्याने जेमिसनची हॅट्ट्रिक हुकली. यानंतर जर्मेन ब्लॅकवुड आणि शमारा ब्रूक्‍स यांनी पाचव्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु जेमीसनने ही जोडी फोडत विंडीज संघाला आणखी एक हादरा दिला. यानंतर कर्णधार जॅसन होल्डार (9) आणि अल्झारी जोसेफ यांना बाद करत त्याने आपल्या पाच विकेट पूर्ण केल्या.

पहिल्या कसोटी सामन्यात शतक ठोकणाऱ्या ब्लॅकवुडने जेमीसनची हॅटट्रिक होण्यापासून रोखली. ब्लॅकवुडने या सामन्यातही निर्णायक खेळी करत 69 धावा केल्या. यापूर्वी टिम साउदीने क्रेग ब्रॅथवेट आणि डॅरेन ब्राव्हो या आघाडीच्या फलंदाजांना बाद केले. यामुळे विंडीजची 16 षटकांत 6 बाद 29 अशी अवस्था झाली होती.

तत्पूर्वी, 6 बाद 296 धावांहून पुढे खेळताना हेन्‍री निकोल्स आणि नील वॅगनर यांनी नवव्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी करत न्यूझीलंडला 460 धावांपर्यत मजल मारून दिली. निकोल्स 174 धावांवर बाद झाला. ही त्याची कसोटी कारकिर्दीतील आतापर्यतची विक्रमी खेळी ठरली. यापूर्वी त्याने श्रीलंकेविरुद्ध 162 धावा केल्या होत्या. यासोबतच वॅगनरनेही नाबाद 66 धावा करत कसोटीतील पहिले अर्धशतक ठोकले. त्याने या आक्रमक खेळीत आठ चौकार आणि चार षटकार ठोकले. निकोलसने विल यंगसह 70, बी.जे. वॅटलिंगबरोबर 55, डॅरेल मिशेलसह 83 आणि जेमीसनबरोबर 50 धावांची भागीदारी केली.

संक्षिप्त धावफलक
न्यूझिलंड पहिला डाव ः 114 षटकात सर्वबाद 460 (डॅरेल मिचेल 42, विल यंग 43, हेन्‍री निकोल्स 174, नील वॅगनर नाबाद 66. शॅनन गॅब्रीयल 3-93, अल्झारी जोसेफ 3-109, चेमर होल्डर 2-110). वेस्ट इंडिज पहिला डाव ः 52 षटकात 8 बाद 124 (जर्मेन ब्लॅकवुड 69, शमारा ब्रूक्‍स 14, जोशुआ डिसिल्वा नाबाद 2, चेमर होल्डन नाबाद 5. केल जेमिसन 5-34, टिम साउदी 3-29)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.