“सर, आमच्याकडे नालेसफाई झालीच नाही’ पहिल्याच दिवशी पुणे पालिकेकडे आल्या 34 तक्रारी

पुणे – शहरातील पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई दि. 20 जूनपूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. नागरिकांना तक्रार करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन उपायुक्त महेश पाटील तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांचे मोबाइल क्रमांकही जाहीर केले आहेत. या मोबाइलवर पहिल्याच दिवशी 34 तक्रारी दाखल आल्या आहेत. यातील अनेक तक्रारी उपनगरांमधील असून, काही तक्रारींमध्ये नागरिकांनी व्हिडिओ पाठवून नाल्याची सद्यस्थिती दाखवून दिली आहे.
पालिकेने यावर्षी मार्चमध्येच पावसाळी कामे सुरू केली. मात्र, जून सुरू होत आला तरी अद्याप ही कामे पूर्ण झालेली नाहीत. आयुक्त स्वत: या कामांची पाहणी करत आहेत. यादरम्यान अनेक भागांत नालेसफाई झालेली नसल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी संबंधितांना धारेवर धरत कारवाई केली आहे. शहरातील नालेसफाईची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आयुक्तांनी अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांकच नागरिकांसाठी जाहीर केले आहे. यावर नागरिकांना केवळ व्हॉट्स ऍपवर फोटो आणि व्हिडिओ पाठविता येणार आहेत.
अहवाल पाठवणे बंधनकारक
प्राप्त झालेल्या या तक्रारी आपत्ती व्यवस्थापन विभागाने संबंधित भागाच्या परिमंडळाचे उपायुक्त, क्षेत्रीय अधिकारी तसेच मलनि:सारण विभागास पाठवल्या आहेत. या विभागांनी तातडीने नाले, चेंबरची स्वच्छता करून काम पूर्ण करण्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या असून, यासाठी अधिकाऱ्यांचा स्वतंत्र ग्रुपही करण्यात आला आहे. नाले, चेंबरसोबतच शहरातील काही नागरिकांनी सार्वजनिक स्वच्छतागृह तसेच अस्वच्छतेचे फोटोही पाठविले आहेत. हे फोटो घनकचरा व्यवस्थापन विभागास पाठविण्यात आले आहेत.
पुणेकरांनो, या क्रमांकावर करा तक्रारी
उपायुक्त महेश पाटील – 9689-93-05-31
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने – 9689-93-54-62





