माही विक्रमांच्या उंबरठ्यावर

मुंबई  -बेस्ट फिनिशर महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करत आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने तीन वेळा विजेतेपद मिळविले आहे. यंदा विजेतेपदाचा चौकार फटकावण्याची तसेच विविध विक्रमी कामगिरींची नोंद आपल्या नावावर करण्याची धोनीला नामी संधी आहे.

एक यष्टीरक्षक म्हणून धोनीला या वर्षी आयपीएलमध्ये अनोखा विक्रम साकार करण्याची संधी आहे. त्याने स्पर्धेतील 204 सामन्यात आतापर्यंत 148 बळी मिळवले आहेत. त्यात 1 झेल व आणि 39 यष्टीचीत बळी आहेत. आणखी दोन बळी घेतल्यावर यष्टीमागे दीडशे बळी नोंदले जातील. अशी कामगिरी करणारा धोनी आयपीएलमधील पहिलाच यष्टीरक्षक ठरेल.

धोनीनंतर कोलकाता नाइट रायडर्सचा दिनेश कार्तिकचा क्रमांक लागतो. त्याने 196 सामन्यात 140, रॉबिन उथप्पाने 189 सामन्यात 90 तर, पार्थिव पटेल 81 यांनीही कामगिरी केली आहे. तसेच टी-20 क्रिकेटमध्ये 7 हजार धावा करण्यासाठी धोनीला 179 धावांची गरज आहे. त्याने आतापर्यंत 6 हजार 821 धावा केल्या आहेत. धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 186 षटकार मारले आहेत. 200 षटकार करण्यासाठी त्याला आणखी 14 षटकारांची गरज आहे. तर त्याच्या एकूण षटकारांची संख्या 209 इतकी आहे. भारतीय क्रिकेटपटूंमध्ये तो अव्वल स्थानी तर आयपीएलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत 204 सामने खेळले आहेत. धोनीने आयपीएलमध्ये रॉय चॅलेंजर बेंगळूरूविरुद्ध 832 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये एखाद्या संघाविरुद्ध कोणत्याही खेळाडूने केलेल्या या सर्वाधिक धावा आहे. तसेच धोनी हा असा एकमेव कर्णधार आहे ज्याने आयपीएलमध्ये 100 सामन्यात विजय मिळवला आहे. डेथ ओव्हर्समध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. धोनीने डेथ ओव्हरमध्ये 141 षटकार मारले आहेत. षटकारांचे दीडशतक करण्याची नामी संधीही त्याला यंदाच्या स्पर्धेत
मिळाली आहे.

खेळाडूंचे लसीकरण कधी
आयपीएल स्पर्धेतील सर्व खेळाडूंचे लसीकरण केले जाणार आहे व त्यानंतर त्यांचा अहवाल पाहुनच खेळाडूंना खेळण्याची परवानगी दिली जाइल, असे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्‍ला यांनी सांगितले होते. मात्र, स्पर्धेला केवळ चार दिवसांचाच अवधी असून त्यापूर्वी सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ, संघमालक तसेच या सर्वांचे कुटुंबीय यांचे लसीकरण कधी होणार किंवा कधी करायचे याबाबत बीसीसीआय अद्याप संभ्रमात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.